Best News Portal Development Company In India

धडक कारवाई! महामार्गावर मोटरसायकल अडवून लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून प्रमुख आरोपी जेरबंद!

धडक कारवाई! महामार्गावर मोटरसायकल अडवून लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून प्रमुख आरोपी जेरबंद!
तुळजापूर प्रतिनिधी ;-
महामार्गावर तसेच निर्जन रस्त्यांवर दुचाकीस्वारांना व महिलांना अडवून मारहाण करत लुटमार करणाऱ्या अट्टल टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत टोळीचा म्होरक्या अनिल भीमा पवार याला शिताफीने पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून सोन्याचे दागिने, मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ₹७३,०००/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे परांडा पोलीस ठाण्यातील जबरी चोरीचे दोन गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.
​परांडा पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यातील (गु.र.नं. ३६२/२०२६, BNS कलम ३०९, ११५(२), ३(५)) संशयितांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक १७ ऑगस्ट २०२६ रोजी गस्त घालत होते. या दरम्यान तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीनुसार, सदर लुटमारीचा गुन्हा मोहा (ता. कळंब) येथील अनिल भीमा पवार याने आपल्या ३ साथीदारांसह केल्याचे व तो सध्या येरमाळा परिसरात आल्याची पक्की माहिती मिळाली.
​माहिती मिळताच पथकाने येडेश्वरी मंदिर ते मलकापूर पाटी दरम्यान सापळा रचला. अनिल पवार हा मोटरसायकलवरून जात असताना पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला. मात्र, पोलिसांना पाहून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी अत्यंत शिताफीने पाठलाग करून त्याला जागीच पकडले.
​शुरुवातीला आरोपी अनिल याने उडवाउडवीची उत्तरे देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अधिक विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
​आरोपीने दिलेल्या माहितीनुसार:
​पहिली घटना (दुधnormal शिवार): मागील महिन्यात परांडा हद्दीतील दुधनी शिवारात मोटरसायकलवरून जाणाऱ्या एका पुरुषाला व महिलेला अडवून जबर मारहाण केली आणि त्यांच्याकडील रोख रक्कम, मोबाईल व सोन्याचे दागिने लुटले.
​दुसरी घटना (सोनगिरी शिवार): तीन महिन्यांपूर्वी सोनगिरी शिवारात शेतात जाणाऱ्या एका महिलेला अडवून मारहाण करत तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लांबवले होते.
​७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
​लुटलेल्या मुद्देमालाबाबत चौकशी केली असता, त्याच्या वाटणीला आलेले सोन्याचे दागिने व मोबाईल त्याने मोहा येथील त्याच्या राहत्या घरात ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपीच्या घरातून सोन्याचे दागिने, मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण ७३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
​सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद ईजजपवार, सपोनि सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद ज्ञानराव, नितीन जाधवर, पोलीस नाईक बबन जाधवर, पुष्कर मुंगळे, चालक पोहेकॉ महबूब अरब, सुभाष चौरे, प्रकाश बोईनवाड, रणनवरे व RCP पथकातील कर्मचाऱ्यांनी केली आहे.
​पोलीस सध्या आरोपीच्या इतर ३ फरार साथीदारांचा तीव्रतेने शोध घेत आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india