भक्तीचा अनुपम नजराणा! बीदरच्या बेमलखेडकर कुटुंबाकडून श्री तुळजाभवानी देवीला सव्वादोन किलोचा चांदीचा पाळणा अर्पण!
तुळजापूर प्रतिनिधी :- महाराष्ट्राची कुलस्वामिनी,
साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ असलेल्या श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी भक्तांकडून अर्पण केल्या जाणाऱ्या दानाचा ओघ कायम आहे. कर्नाटक राज्यातील बीदर येथील भाविक श्री. प्रणय बेमलखेडकर यांनी तुळजाभवानी देवीच्या चरणी तब्बल २ किलो १३४ ग्रॅम वजनाचा सुबक चांदीचा पाळणा अर्पण करून आपली श्रद्धा व्यक्त केली आहे.
श्री. प्रणय बेमलखेडकर हे मंगळवारी आपल्या कुटुंबीयांसह श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे आले होते. देवीचे भावपूर्ण दर्शन घेतल्यानंतर त्यांनी हा मौल्यवान चांदीचा पाळणा मंदिर संस्थानकडे सुपूर्द केला.
मंदिर संस्थानतर्फे यथोचित सन्मान
या दानाबद्दल श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने प्रणय बेमलखेडकर व त्यांच्या कुटुंबीयांचा श्रीफळ आणि प्रसाद देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी श्री. अमोल कर्डिले, श्री. महेश गंजे यांच्यासह मंदिर संस्थानचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. देवीच्या चरणी अर्पण करण्यात आलेला हा चांदीचा पाळणा सध्या भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.







