काक्रंबा वाडीचा सन्मान! अण्णासाहेब कोळेकर यांना ‘जिल्हास्तरीय उत्कृष्ट पोलीस पाटील’ पुरस्कार प्रदान!
धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांच्या हस्ते परंडा येथे विशेष सन्मानाने गौरव
तुळजापूर प्रतिनिधी :- प्रशासनाकडून उत्कृष्ट कामाची पोचपावती तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा वाडी येथील पोलीस पाटील श्री. अण्णासाहेब कोळेकर यांच्या उत्कृष्ट सामाजिक व प्रशासकीय कार्याची दखल घेत महसूल विभागाच्या वतीने त्यांना ‘जिल्हास्तरीय उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.
परंडा येथे आयोजित महसूल विभागाच्या विशेष कार्यक्रमात धाराशिव जिल्ह्याचे मा. जिल्हाधिकारी श्री. कीर्ती कुमार पुजार (IAS) यांच्या शुभहस्ते हा मानाचा पुरस्कार पोलीस पाटील अण्णासाहेब कोळेकर यांना देण्यात आला.
गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणे, महसूल विभागाच्या विविध जनकल्याणकारी योजना आणि प्रशासकीय कामे वेळेत पूर्ण करणे, तसेच काक्रंबा वाडी ग्रामस्थांमध्ये सामाजिक सलोखा व शांतता टिकवून ठेवण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या याच उल्लेखनीय आणि ध्येयनिष्ठ कार्याची दखल घेऊन महसूल प्रशासनाने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली.
”हा पुरस्कार म्हणजे ग्रामस्थांच्या विश्वासाचे फळ” – अण्णासाहेब कोळेकर
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मिळालेल्या या विशेष बहुमानाबद्दल भावना व्यक्त करताना श्री. अण्णासाहेब कोळेकर म्हणाले,
”हा पुरस्कार म्हणजे केवळ माझा एकट्याचा सन्मान नसून, माझ्या काक्रंबा वाडी गावातील नागरिक, माझे कुटुंब आणि सहकाऱ्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाचे फळ आहे. या पुरस्कारामुळे प्रशासकीय आणि सामाजिक कामातील माझी जबाबदारी अधिक वाढली असून, पुढेही गावाच्या सेवेसाठी कटिबद्ध राहीन.”
अण्णासाहेब कोळेकर यांना जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाल्याचे वृत्त समजताच काक्रंबा वाडी ग्रामस्थ, महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी, पोलीस पाटील संघटना आणि त्यांच्या मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







