तुळजापूर पंचक्रोशीत अवैध गौणखनिज उत्खननाचा धुमाकूळ: विकासकामांच्या नावाखाली डोंगर अन् शेतजमिनी उद्ध्वस्त!
तुळजापूर प्रतिनिधी :-
तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरासह परिसरात सध्या विविध महामार्ग, रस्ते, रेल्वेमार्ग आणि अन्य मोठ्या विकासकामांची लगबग सुरू आहे. मात्र, या कामांचा आडोसा घेत पंचक्रोशीतील डोंगर आणि शेतजमिनींमधून अवैध गौणखनिजाचा बेछूट उपसा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अपसिंगा, सिंदफळ आणि भातंबरे या भागांतील निसर्गरम्य डोंगर चक्क दिवसाढवळ्या फोडले जात असून या बेकायदेशीर व्यवसायातून करोडो रुपयांची आर्थिक उलाढाल होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
जेसीबी अन् डंपरचा सर्रास वापर
उत्खननासाठी कोणत्याही परवानग्या न घेता जेसीबी, पोकलेन, ट्रॅक्टर आणि डंपर यांसारख्या अवजड वाहनांचा उघडपणे वापर केला जात आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत असून निसर्गरम्य डोंगर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
१०८ फुटी पुतळा परिसर आणि वीटभट्ट्यांचे लक्ष्य
विशेष म्हणजे, तुळजापूर परिसरातील प्रस्तावित १०८ फुटी पुतळ्याच्या लगत असलेल्या शेतजमिनींमधूनही मुरुमाचा मोठ्या प्रमाणावर उपसा सुरू असल्याच्या गंभीर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याशिवाय, स्थानिक वीटभट्टी व्यावसायिक आणि खडी क्रशर चालक नियमांची पायमल्ली करत ठरवून दिलेल्या क्षेत्राव्यतिरिक्त इतर ठिकाणच्या शेतजमिनींमधून गौणखनिज उपसत असल्याचा आरोप होत आहे.
जीपीएसद्वारे पाहणी करण्याची मागणी
अवैध उत्खननामुळे शासनाचा मोठा महसूल बुडत असून पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे. यावर आळा घालण्यासाठी महसूल यंत्रणेने तातडीने या भागांची पाहणी करावी, तसेच अवैध उत्खनन झालेल्या सर्व ठिकाणांची जीपीएस (GPS) यंत्रणेद्वारे अचूक तपासणी करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी तीव्र मागणी तुळजापूर पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून केली जात आहे.






