सिंदफळ येथे बंद घर फोडून लांबवले सोन्या-चांदीचे दागिने; तुळजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल!
तुळजापूर प्रतिनिधी :-तुळजापूर तालुक्यात, शहरात आणि आज आसपासच्या खेडेगावात चोरट्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यांचा सुळसुळाट सुटलेला आहे. तालुक्यातील सिंदफळ येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडी-कोंडा तोडून घरातील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तात्याराव अशोक धनके (वय ४० वर्ष, मूळ रा. सिंदफळ, ता. तुळजापूर, जि. धाराशिव; सध्या रा. भोसरी, पुणे) यांचे सिंदफळ येथील घर बंद असताना ही चोरी झाली. दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:०० ते १८ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे ०३:०० वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने बंद घराचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील एकूण १९,५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लांबवले.
या घटनेप्रकरणी फिर्यादी तात्याराव धनके यांनी २० ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(४) आणि ३०५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तुळजापूर पोलीस करत आहेत.
सदरील घटनेने परिसरात खळबळ उडाली असून लवकरात लवकर चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता नागरिकातून होत आहे.






