Best News Portal Development Company In India

कामठा शाळेतील CCTV यंत्रणेची चौकशी करा! उपलब्धता, खरेदीपासून कार्यरत स्थितीपर्यंत पडताळणीची मागणी; जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे अर्ज!

कामठा शाळेतील CCTV यंत्रणेची चौकशी करा!

उपलब्धता, खरेदीपासून कार्यरत स्थितीपर्यंत पडताळणीची मागणी; जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे अर्ज!

तुळजापूर प्रतिनिधी :- तालुक्यातील कामठा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या आणि शालेय परिसराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बसविण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांच्या यंत्रणेची वस्तुनिष्ठ व निष्पक्ष प्रशासकीय पडताळणी करावी, अशी मागणी  सुधीर  जमदाडे यांनी जिल्हा परिषद धाराशिवचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे  केली आहे.

या अर्जामध्ये CCTV यंत्रणेची सद्यस्थिती, उपलब्धता, कार्यरत स्थिती तसेच त्यासंबंधीच्या शासकीय अभिलेखांची माहिती मागविण्यात आली आहे. माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत संबंधित अभिलेखांच्या प्रती मिळाव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.

या निवेदनाद्वारे कोणत्याही व्यक्तीविरुद्ध गैरव्यवहार, निष्काळजीपणा किंवा अन्य आरोप करण्यात आलेला नसल्याचे अर्जदाराने स्पष्ट केले आहे. उपलब्ध शासकीय अभिलेख, प्रत्यक्ष पाहणी आणि संबंधितांकडून प्राप्त माहितीच्या आधारे वस्तुस्थिती निष्पक्षपणे स्पष्ट व्हावी, शाळेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक दक्षता घ्यावी आणि शासकीय मालमत्तेची योग्य नोंद व सुरक्षितता सुनिश्चित व्हावी, हा अर्जामागील उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

त्यामुळे या प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि वस्तुनिष्ठ प्रशासकीय पडताळणी करून वस्तुस्थितीचा अहवाल प्राप्त करावा आणि आवश्यक असल्यास नियमानुसार पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अर्जाची प्रत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तुळजापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आणि गटविकास अधिकारी यांनाही माहितीस्तव देण्यात आली आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india