Best News Portal Development Company In India

तुळजापूरच्या माळुंब्रा येथे ४ किमीच्या हवाई धावपट्टीला ‘AAI’ ची हिरवी पसंती; धाराशिवमध्ये पायलट ट्रेनिंग व ड्रोन रिसर्च सेंटर!

तुळजापूरच्या माळुंब्रा येथे ४ किमीच्या हवाई धावपट्टीला ‘AAI’ ची हिरवी पसंती; धाराशिवमध्ये पायलट ट्रेनिंग व ड्रोन रिसर्च सेंटर!
​तुळजापूर प्रतिनिधी;-
जिल्ह्याच्या कृषी, औद्योगिक आणि पर्यटन विकासाला मोठी गती देण्यासाठी तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथे प्रस्तावित ४ किलोमीटर लांबीच्या हवाई धावपट्टीच्या जागेची भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (AAI) उच्चस्तरीय पथकाने गुरुवारी प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीनंतर प्राधिकरणाने प्रस्तावित जागेबाबत अत्यंत सकारात्मकता दर्शवली असून, जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचे पाऊल पुढे पडले आहे, अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह (दादा)पाटील यांनी दिली.
​मल्टी-मॉडल लॉजिस्टिक हब: माळुंब्रा येथील प्रस्तावित धावपट्टी राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वेमार्गाशी थेट जोडलेली असल्याने हे ठिकाण लॉजिस्टिकच्या दृष्टीने अत्यंत मोलाचे ठरणार आहे.
​आर्थिक व कृषी क्षेत्राला चालना: या प्रकल्पामुळे शेतमालाची जलद वाहतूक शक्य होईल. तसेच औद्योगिक गुंतवणुकीला गती मिळून स्थानिक नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
​धार्मिक पर्यटनाला बळ: तुळजापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्याने विमानसेवेमुळे देश-विदेशातील भाविक आणि पर्यटकांसाठी दळणवळण अधिक सोपे होणार आहे. माळुंब्रा व्यतिरिक्त धाराशिव येथील दुरुस्ती झालेल्या धावपट्टीचीही पथकाने पाहणी केली. येथे वैमानिक प्रशिक्षण केंद्र (Pilot Training Center) सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
​ड्रोन तंत्रज्ञान केंद्र- धाराशिव येथे भविष्यात मिलिटरी ड्रोनच्या चाचण्या, ड्रोन निर्मिती आणि संशोधन (R&D) केंद्र विकसित करण्याचे प्रस्तावित आहे.
या पाहणी दरम्यान ‘AAI’ चे जनरल मॅनेजर रोशन कांबळे, अनुराग मिश्रा, संजय उके, सुशिल वर्मा, प्रदीप मौर्या, संतू दास, राजेश जीवन यांच्यासह उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार अरविंद बोळंगे आणि महावितरण व बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
​हा प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात साकारला जाऊन धाराशिव जिल्हा दळणवळण, तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात एक नवा टप्पा गाठेल, असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india