Best News Portal Development Company In India

थ्रो बॉलमध्ये कोल्हापूरचा डंका; धाराशिवच्या शंभूराजे मिटकरची झंझावाती कामगिरी!

थ्रो बॉलमध्ये कोल्हापूरचा डंका; धाराशिवच्या शंभूराजे मिटकरची झंझावाती कामगिरी!

नळदुर्ग, दि. २४ ऑगस्ट : एस. के. गायकवाड

बारामती येथे दि.दि. २२ व २३ ऑगस्ट रोजी
झालेल्या तिसऱ्या राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याच्या संघाने उपविजेतेपद पटकावून दमदार कामगिरीची नोंद केली. या यशात धाराशिव जिल्ह्यातील वागदरी ता.
तुळजापूर येथील युवा खेळाडू शंभूराजे मिटकर याचा मोलाचा वाटा राहिला. राज्यस्तरीय व्यासपीठावर चमकदार खेळ करत शंभूराजेने धाराशिव जिल्ह्याची मान उंचावली.

बारामती महा थ्रो बॉल असोसिएशनच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सह्याद्री विद्यानिकेतन, कोल्हापूर येथे शिक्षण घेणारा शंभूराजे शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण करीत आहे. ग्रामीण भागातून आलेल्या या खेळाडूने राज्यस्तरीय स्पर्धेत आपल्या खेळातील कौशल्य, चपळाई आणि आत्मविश्वासाची छाप उमटवली.

सलग विजयांची मालिका; अंतिम फेरीत रंगला थरार

साखळी फेरीत कोल्हापूर संघाने धुळे, नागपूर, पुणे आणि नंदुरबार संघांवर मात करीत गटात अव्वल स्थान मिळविले. उपांत्यपूर्व फेरीत रत्नागिरीचा १५-८, १५-६ असा धुव्वा उडवला. त्यानंतर उपांत्य फेरीत पुणे शहराचा १५-८, १५-१२ असा पराभव करून कोल्हापूरने अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला.

अंतिम सामन्यात सांगली आणि कोल्हापूर यांच्यात चुरशीची लढत झाली. पहिल्या सेटमध्ये सांगलीने १५-१२ अशी बाजी मारली. मात्र, कोल्हापूरने दुसऱ्या सेटमध्ये जोरदार पुनरागमन करीत १५-१३ असा विजय मिळवला. अखेरच्या निर्णायक संघर्षात सांगलीने बाजी मारत विजेतेपद पटकावले; तर कोल्हापूरला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

वागदरीच्या शिरपेचात मानाचा तुरा!

शंभूराजे मिटकरच्या या राज्यस्तरीय कामगिरीमुळे वागदरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्याच्या यशाबद्दल क्रीडाप्रेमी, ग्रामस्थ, शिक्षक व विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाला क्रीडेची जोड देत राज्य व राष्ट्रीय पातळीवर झेप घ्यावी, यासाठी शंभूराजेची कामगिरी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india