भूम पोलिसांचा ‘खाकी’ दणका! वाहतूक नियम मोडणाऱ्या २१४ वाहनचालकांवर धडक कारवाई, १.६३ लाखांचा दंड वसूल!
तुळजापूर प्रतिनिधी;-
वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या बेफिक्र वाहनचालकांविरुद्ध भूम पोलीस ठाण्याच्या पथकाने २७ ऑगस्ट रोजी धडक विशेष मोहीम राबवत जोरदार दणका दिला आहे. भूम शहरातील गोलाई चौक, बसस्थानक परिसर आणि इतर प्रमुख ठिकाणी केलेल्या या धडक कारवाईत एकूण २१४ केसेस नोंदवून १ लाख ६३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ‘ॲक्शन मोड’
ही विशेष मोहीम पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच परि. पोलीस उपअधीक्षक श्री. अमोल मोहिते यांच्या थेट नेतृत्वाखाली पार पडली. या कारवाईत भूम पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी आणि वाहतूक शाखा (धाराशिव) चे अंमलदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गाजली कुऱ्हाड
पोलीस पथकाने रस्त्यावर उतरून मोटार वाहन कायद्यांतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खालील प्रकारच्या वाहनांवर आणि चालकांवर थेट कारवाई केली.
फॅन्सी व विना नंबर प्लेट- नंबर प्लेट नसलेली किंवा बेकायदेशीर फॅन्सी नंबर असलेली वाहने.
हेल्मेट व लायसन्सचा अभाव: विना ड्रायव्हिंग लायसन्स आणि विना हेल्मेट दुचाकी चालवणे.
धोकादायक प्रवास- दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करणे आणि सीट बेल्ट न लावता चारचाकी चालवणे.
मॉडिफाइड सायलेंसर व टिंटेड ग्लास: कर्कश आवाज करणारे सायलेंसर आणि गाड्यांना काळ्या काचा (टिंटेड ग्लास) वापरणे. वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे आणि रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने पार्क करणे.
या धडक मोहिमेत परि. पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांच्यासोबत सपोनि गणेश खांडे, पोहेका कोळी, कवडे, शिंदे (१२२३), शिंदे (१३६४), वहील, किवंडे, डोके, तसेच पोलीस अंमलदार गांधले, कोरे, कलाल, यादव, जाधव, वाघमारे आणि नाईकवाडी यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कारवाई फत्ते केली.
नियम पाळा, अन्यथा कठोर कारवाई अटळ!
कारवाईदरम्यान भूम पोलीस ठाण्याच्या वतीने शहरातील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना आणि वाहनचालकांना वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. यापुढेही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अशीच कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.







