तुळजापुरात ‘माउली पान शॉप’च्या शेजारी पोलिसांची मोठी कारवाई; ₹२४ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, ५५ वर्षांच्या चालकावर गुन्हा दाखल!
तुळजापूर प्रतिनिधी :-
तीर्थक्षेत्र तुळजापुरात प्रतिबंधित गुटख्याच्या खुलेआम विक्रीवर अखेर पोलिसांनी हातोडा मारला आहे. मंदिर परिसरातील वाघमारे गल्ली येथे टाकलेल्या छाप्यात तुळजापूर पोलिसांनी तब्बल ₹२४,४२१ किमतीचा बेकायदेशीर गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले. या कारवाईमुळे अवैध गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत.
वाघमारे गल्लीत पोलिसांची धाड
दिनांक २७ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास वाघमारे गल्लीतील ‘माउली पान शॉप’च्या बाजूला एका व्यक्तीकडे प्रतिबंधित गुटख्याचा साठा असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संजय बाबुराव गलांडे (वय ५५, रा. समर्थ नगर, तुळजापूर) याला रंगेहात पकडले.
जप्त केलेला मुद्देमाल:
केसरयुक्त पान मसाला
डायरेक्टर स्पेशल पान मसाला
बादशाह गुटखा
व्ही-१ टोबॅको
गोवा-१०००
के.आर. शॉट ९९९ चुइंग टोबॅको
अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
शासनाने बंदी घातलेला हा साठा विक्रीसाठी साठवून ठेवल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५ सह ‘अन्न सुरक्षा व मानके कायद्या’च्या विविध कलमांनुसार तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागरिकांचा सवाल: बाकीच्या अड्ड्यांवर कारवाई कधी?
तुळजापूर शहरात अनेक ठिकाणी गुटख्याची विक्री सर्रास सुरू असताना पोलिसांनी केवळ एकाच ठिकाणी कारवाई केल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे. “एका ठिकाणी छापा टाकून कर्तव्य संपले का?” असा थेट सवाल विचारत तुळजापूरकरांनी शहरातील सर्वच अवैध गुटखा विक्रीच्या ठिकाणांचा बिमोड करण्याची मागणी केली आहे.







