तुळजापूर मंदिर परिसरात भाविकांचे दागिने लंपास; गर्दीचा फायदा घेत अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र लांबवले!
तुळजापूर प्रतिनिधी:- लाखो रुपयांचे सीसीटीव्ही तरीही तुळजापूर शहरात आणि मंदिर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ प्रशासनाची बघ्याची भूमिका ठोस पावले उचलण्याची गरज. कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या भाविक भक्तांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या एका महिला भाविकाचे सोन्याचे दागिने गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोराने लांबवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव (जि. सातारा) येथील रहिवासी आणि सध्या धारी (पुणे) येथे राहणाऱ्या नलीनी गुलाबराव भोसले (वय ५९) या दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी आपल्या कुटुंबासह श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे आल्या होत्या. सकाळी १०.५० ते ११.०० वाजण्याच्या सुमारास देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्या मंदिरातील गणपती मंदिर ते महाद्वार या मार्गावरून जात होत्या.
या दरम्यान भाविकांच्या प्रचंड गर्दीचा गैरफायदा घेत एका अज्ञात चोरट्याने नलीनी भोसले यांच्या गळ्यातील सुमारे अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने शिताफीने चोरून नेले. लांबवलेल्या या दागिन्यांची एकूण किंमत सुमारे १,००,००० रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर नलीनी भोसले यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तुळजापूर पोलीस करत आहेत.
पोलिसांचे आवाहन: तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी गर्दीच्या ठिकाणी आपल्या मौल्यवान वस्तू, मोबाईल आणि दागिन्यांची काळजी घ्यावी व सतर्क राहावे.






