तुळजापूर पोलीस ठाण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक संपन्न; ‘डी.जे.मुक्त’ आणि शिस्तबद्ध उत्सव साजरा करण्याचे आवाहन!
तुळजापूर प्रतिनिधी:-
आगामी गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी आज पोलीस ठाणे तुळजापूर येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठक उपविभागीय पोलीस अधिकारी (तुळजापूर उपविभाग) मा. श्री. मनोहर पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीस नगर परिषद तुळजापूर व महावितरण विभागाचे अधिकारी व प्रतिनिधी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य तसेच पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान पोलीस प्रशासनातर्फे उपस्थितांना आगामी उत्सवाच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने डी.जे. व डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करणे, ध्वनीप्रदूषणासंदर्भातील शासकीय नियमांचे तंतोतंत पालन करणे, तसेच आगमन व विसर्जन मिरवणुकीदरम्यान आवश्यक ती सर्व दक्षता घेण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले. शहरात वाहतूक व्यवस्था सुळीत ठेवणे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
तसेच, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शासन व प्रशासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात येणारे सर्व आदेश, नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांची माहिती उपस्थितांना देऊन त्यांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देशित करण्यात आले.
”सर्व गणेश मंडळांनी आणि नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करून हा उत्सव अत्यंत शांततेत, सुरक्षिततेने आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करावा,” असे आवाहन अध्यक्षीय भाषणात मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. मनोहर पाटील यांनी केले.







