अणदूर येथील SBI बँकेत १.४० लाखांचा डल्ला; खोट्या कागदपत्रांच्या आधारे ग्राहकाचे खाते रिकामे, चौघांवर गुन्हा दाखल!
तुळजापूर प्रतिनिधी:-
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) अणदूर शाखेत बनावट कागदपत्रे सादर करून एका ग्राहकाच्या बँक खात्यातून १ लाख ४० हजार रुपये काढून बँकेची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मायकल रमेश चव्हाण, मनीषा रमेश चव्हाण, शांताबाई विठ्ठल माळी आणि त्यांचा एक साथीदार (सर्व रा. सेटलमेंट एरिया, सोलापूर) यांनी २ जानेवारी २०२६ ते २९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आपसात संगनमत केले. आरोपींनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा अणदूर येथील खातेधारक लक्ष्मण दाजीबा गायकवाड (रा. अणदूर) यांचे बँक खाते क्र. ११५०७३५०७५४ याचे खोटे व बनावट दस्तऐवज तयार केले.
या बनावट कागदपत्रांच्या आधारे आरोपींनी गायकवाड यांच्या खात्यातून १,४०,००० रुपये काढून घेत बँकेची आणि खातेदाराची फसवणूक केली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर धनंजय इंगळे यांनी २९ ऑगस्ट २०२६ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
धनंजय इंगळे यांच्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१९(२), ३१८(४), ३३६(३), ३४०(२), ३५१(२) आणि ३(५) अन्वये फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.





