Best News Portal Development Company In India

धक्कादायक! जकात आणि देणगीच्या नावाखाली भाविकांची फसवणूक; धाराशिवमध्ये SIO च्या दोन सदस्यांवर गुन्हा दाखल!

धक्कादायक! जकात आणि देणगीच्या नावाखाली भाविकांची फसवणूक; धाराशिवमध्ये SIO च्या दोन सदस्यांवर गुन्हा दाखल!
​तुळजापूर प्रतिनिधी:-
स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन (SIO) या संस्थेच्या नावाचा गैरवापर करून, जकात आणि देणगीच्या आमिषाने नागरिकांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार धाराशिव शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाच्या (ATS) तक्रारीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अस्लम चांदपाशा शेख (रा. खाजा नगर, धाराशिव) आणि निहाल सिकंदर शेख (रा. सुलतानपुरा, येडशी रोड, धाराशिव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
​मिळालेल्या माहितीनुसार, ८ मार्च २०२५ ते २ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आरोपींनी आपसात संगणमत करून ‘स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन (SIO) धाराशिव’ या संस्थेच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट्सवरून जकात देण्याचे आमिष दाखवले. संस्थेच्या नावाने देणगी देण्याचे आवाहन करून त्यांनी आधी नागरिकांचा विश्वास संपादन केला.
​त्यानंतर, गोळा होणारा निधी SIO संस्थेच्या अधिकृत बँक खात्यावर जमा न करता, आरोपींनी स्वतःच्या वैयक्तिक बँक खात्यांवर वर्ग करून घेतला. यासाठी त्यांनी ७८७५९५९०४९ आणि ७०२०१५२०५१ या मोबाईल क्रमांकांचे UPI ID, QR कोड आणि मोबाईल नंबर प्रसारित करून परस्पर निधी जमा केला व लोकांची मोठी फसवणूक केली.
​दहशतवाद विरोधी पथकाची (ATS) कारवाई
या सर्व गैरप्रकाराचा सुगावा लागल्यानंतर दहशतवाद विरोधी पथक (ATS), छत्रपती संभाजीनगर युनिट कॅम्प धाराशिवचे अधिकारी फयाजोद्दीन गयासोद्दीन काझी (वय ४९ वर्षे) यांनी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात तक्रार (प्रथम खबर) दिली.
​त्यांच्या तक्रारीवरून धाराशिव शहर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१६(२), ३१८(४), ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम ६६ (ड) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अधिक तपास करत आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india