श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे उद्घाटन!
उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अर्जुन कटके होते.
यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांनी विद्यार्थ्यांनी जीवनात यश मिळविण्यासाठी जिद्द, चिकाटी आणि सातत्य या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन केले. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी पुरेशी नसून विद्यार्थ्यांनी कौशल्य, तंत्रज्ञानाचे ज्ञान, संवादकौशल्य, नेतृत्वगुण आणि उद्योजकीय दृष्टिकोन विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या माध्यमातून शिक्षण, कौशल्य विकास व रोजगाराभिमुख प्रशिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. अंगणवाडी-बालवाडी, पत्रकारिता, दुग्ध व्यवसाय आणि ड्रेस डिझाईन यांसारख्या अभ्यासक्रमांचा विद्यार्थ्यांनी व इच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. डिजिटल युगात संगणक, इंटरनेट, डिजिटल व्यवहार तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांचे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. अर्जुन कटके यांनी करिअर कट्टा उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट करून विद्यार्थ्यांनी उपलब्ध करिअर संधींची माहिती घेऊन योग्य नियोजन करावे, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस. एल. राठोड यांनी केले, तर आभार डॉ. प्रवीण गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






