अमानुष वाहतूक! उमरगा पोलिसांची धडक कारवाई; गंधर्व हॉटेलजवळ ७० हजारांच्या १० खेचरांसह पिकअप जप्त, चालकावर गुन्हा दाखल!
तुळजापूर प्रतिनिधी:-
मुक्या प्राण्यांची अत्यंत निर्दयपणे आणि कोणत्याही वैरण-पाण्याची सोय न करता दाटीवाटीने वाहतूक करणाऱ्या आंध्र प्रदेशातील एका चालकाविरोधात उमरगा पोलीस ठाण्यात धडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी १० लहान-मोठे घोडे (खेचर) आणि वाहतुकीसाठी वापरलेली पिकअप असा एकूण २ लाख ७० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे २:१५ वाजण्याच्या सुमारास उमरगा बायपास रोडवरील गंधर्व हॉटेलसमोर पोलीस पथक गस्तीवर होते. यावेळी संशयास्पद वाटणाऱ्या एका पिकअपची (क्र. AP 39 WG 7409) तपासणी केली असता, त्यात १० लहान-मोठे घोडे (खेचर) क्रूरपणे आणि दाटीवाटीने कोंबलेले आढळले. प्राण्यांसाठी चारा किंवा पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती.
याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी चालक व्यंकटेश व्यंकटय्या पिंन्ड्राला (वय ३३ वर्ष, रा. ७/११ जनार्धन कॉलनी, मार्टुर, ता. मार्टुर, जि. प्रकाशम, आंध्र प्रदेश) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
जप्त केलेला मुद्देमाल:
१० खेचर (लहान-मोठे): रु. ७०,७००/-
पिकअप वाहन: रु. २,००,०००/-
एकूण मुद्देमाल: रु. २,७०,७००/-
उमरगा पोलीस ठाण्यात सरकारतर्फे आरोपीविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम कलम ११(१) (डी), ११(१) (एच), ११(ई) सह मोटर वाहन कायदा (मोवाका) ८३ आणि १७७ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.






