Best News Portal Development Company In India

पावसाच्या मोठ्या खंडाने खरीप पिकांची दाणादाण: आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत शास्त्रज्ञ व महसूल पथकाकडून प्रत्यक्ष पाहणी!

पावसाच्या मोठ्या खंडाने खरीप पिकांची दाणादाण: आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत शास्त्रज्ञ व महसूल पथकाकडून प्रत्यक्ष पाहणी!
​आठवडाभरात जिल्हास्तरीय अहवाल शासनाकडे सादर होणार; पीक कापणी प्रयोग सप्टेंबरमध्येच घेण्याची कृषी आयुक्तांकडे मागणी.
​तुळजापूर प्रतिनिधी;-
पावसातील मोठ्या खंडामुळे धाराशिव जिल्ह्यात खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना शासनाकडून ठोस आणि तातडीची मदत मिळावी यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हा प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत प्रत्यक्ष पाहणीला सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शास्त्रज्ञ, कृषी व महसूल विभागाच्या संयुक्त पथकाकडून शेतांमध्ये जाऊन नुकसानीची शास्त्रीय आणि वस्तुनिष्ठ पाहणी करण्यात आली. येत्या आठवडाभरात या पाहणीचा जिल्हास्तरीय अहवाल शासनाकडे सादर केला जाणार आहे.
​शनिवारी वाशी तालुक्यातील तेरखेडा परिसर आणि तुळजापूर तालुक्यातील इटकळ परिसरातील शेतात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत ही संयुक्त पाहणी पार पडली. यावेळी पथकाने पावसातील खंडाचा पिकांवर झालेला गंभीर परिणाम, पिकांची सद्यस्थिती आणि संभाव्य उत्पादनातील घट यांचा सखोल आढावा घेतला.
​शेतात पीक कापणी प्रयोगापूर्वी कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन.
पाहणीदरम्यान नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे सिद्ध झाल्यास आपत्ती व्यवस्थापनाच्या निकषांनुसार मदत मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक महसूल मंडळात पिकांनुसार पीक कापणी प्रयोगासाठी १२ प्लॉट निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त पिकांची कापणी करण्यापूर्वी आपल्या गावातील निश्चित प्लॉटची माहिती कृषी विभागाकडून अवश्य घ्यावी, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले.
​”नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल वेळेत शासनाकडे सादर होऊन शेतकरी बांधवांना प्रत्यक्ष भरपाई मिळेपर्यंत आमचा पाठपुरावा असाच सातत्याने सुरू राहील.”
— आमदार राणाजगजितसिंह पाटील
​पीक कापणी प्रयोग ऑक्टोबरऐवजी सप्टेंबरमध्येच घेण्याची मागणी.
शेतकरी बांधव अधिक काळ नुकसानग्रस्त पीक शेतात ठेवू शकत नसल्याने अनेकांनी पीक काढणीला सुरुवात केली आहे. नियोजित वेळापत्रकानुसार ऑक्टोबरमध्ये प्रयोग झाल्यास शेतात पीकच उपलब्ध राहणार नाही, ज्यामुळे शेतकरी पीक विमा आणि भरपाईपासून वंचित राहण्याचा धोका आहे. ही बाब लक्षात घेऊन पीक कापणी प्रयोग सप्टेंबर महिन्यातच आयोजित करावेत, अशी आग्रही मागणी आमदार पाटील यांनी कृषी आयुक्तांकडे केली आहे.
​पाहणी पथकात प्रमुख शास्त्रज्ञ व अधिकाऱ्यांचा सहभाग
​तेरखेडा परिसर: आंबेजोगाईचे शास्त्रज्ञ डॉ. अरुण गुट्टे, आयआयटी मुंबईचे डॉ. हेमंत बेलसरे, डॉ. गोपाळ चव्हाण, असीम रामा परवीन; उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार अरविंद बोलंगे, तालुका कृषी अधिकारी गणेश सूर्यवंशी व इतर अधिकारी.
​इटकळ परिसर: उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार अरविंद बोलंगे, आयआयटी मुंबईचे आकाश राठोड व टीम, कृषी विज्ञान केंद्र तुळजापूरचे शास्त्रज्ञ एस. एल. सूर्यवंशी, डॉ. एस. एन. झगडे, प्रा. ए. बी. कसबे, तालुका कृषी अधिकारी के. जे. बचुटे, गट विकास अधिकारी हेमंत भिंगारदेवे आदी उपस्थित होते.
​या पाहणीवेळी तेरखेडा येथे सुधीर घोलप, प्रवीण घुले, प्रभाकर सारूक, अरुण धालगडे, मदन बारकुल यांच्यासह स्थानिक शेतकरी आणि इटकळ येथे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail