श्री तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक उत्साहात बैलपोळा साजरा; मानाच्या बैलांना दाखवला पुरणपोळीचा नैवेद्य!
तुळजापूर प्रतिनिधी :-
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात श्रावण अमावस्येचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही बैलपोळा सण अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.
उत्सवाचा शुभारंभ कमानवेस येथील प्रसिद्ध डुल्या मारुती मंदिरापासून झाला. येथे महंत तुकोजीबुवा, चिलोजीबुवा, भोपे पाटील आणि कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे मानाचे बैल एकत्र आणून त्यांना पारंपरिक पद्धतीने आकर्षक सजवण्यात आले. त्यानंतर वाजत-गाजत, मोठ्या जल्लोषात या मानाच्या बैलांची मिरवणूक श्री तुळजाभवानी मंदिराकडे काढण्यात आली.
मंदिरात पोहोचल्यानंतर या मानाच्या बैलांना थेट श्री तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात नेऊन देवीचे दर्शन घडवण्यात आले. त्यानंतर बैलांचे विधिवत पूजन करून त्यांना पुरणपोळीचा महानैवेद्य दाखवण्यात आला.
या धार्मिक व पारंपरिक सोहळ्याप्रसंगी उपविभागीय अधिकारी तथा विश्वस्त ओंकार देशमुख, सहायक व्यवस्थापक (सामान्य) जयसिंग पाटील, सहायक व्यवस्थापक (धार्मिक) रामेश्वर वाले, तसेच महंत तुकोजीबुवा, महंत चिलोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, महंत हमरोजीबुवा यांच्यासह मंदिर संस्थानचे इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








