मराठवाडा विकास – तुमसे ना हो पाएगा”; ठाकरे गटाचे डॉ. जितेंद्र कानडे यांच्या नेतृत्वात तुळजापुरात जनआंदोलन व तहसीलदारांना निवेदन
तुळजापूर प्रतिनिधी:-
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने “मराठवाडा विकास – तुमसे ना हो पाएगा” या जनआंदोलनांतर्गत उपजिल्हाप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य डॉ. जितेंद्र गुरुनाथ कानडे यांच्या नेतृत्वात तुळजापूर तहसीलदारांना विविध प्रलंबित आणि गंभीर मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
मराठवाड्याच्या विकासाच्या नावाखाली राज्य सरकारकडून केवळ पोकळ आश्वासने दिली जात असल्याचा आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या:
कोरडा दुष्काळ जाहीर करा: पावसाअभावी शेतकऱ्यांचे पेरलेले खरीप पीक जळून गेले असून संपूर्ण मराठवाड्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात त्वरित “कोरडा दुष्काळ” जाहीर करावा.
चारा छावण्या सुरू करा: भविष्यात जनावरांसाठी चारा व पाण्याचा तीव्र तुटवडा भासणार असल्याने प्रशासनाने तात्काळ चारा छावण्या सुरू कराव्यात.
पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करा: एल-निन्होच्या संकटामुळे भीषण दुष्काळाची शक्यता असताना शासनाने कोणतीही पूर्वतयारी केलेली नाही. अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून त्यावर त्वरित उपाययोजना कराव्यात.
अघोषित लोडशेडिंग बंद करा: विनाकारण सुरू असलेले लोडशेडिंग त्वरित बंद करून नागरिक व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
मराठवाड्याच्या हक्काचे २१ TMC पाणी द्या: ‘वॉटर ग्रिड’च्या नावाखाली फसवणूक न करता मराठवाड्याला हक्काचे २1 TMC पाणी तातडीने देण्यात यावे.
शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.








