Best News Portal Development Company In India

धाराशिवचा सुपुत्र पारस कंदलेचा ‘एम्स ऋषिकेश’मध्ये प्रवेश; काँग्रेस भवन येथे जिल्हाध्यक्ष उमेशराजे निंबाळकरांच्या हस्ते विशेष सत्कार!

धाराशिवचा सुपुत्र पारस कंदलेचा ‘एम्स ऋषिकेश’मध्ये प्रवेश; काँग्रेस भवन येथे जिल्हाध्यक्ष उमेशराजे निंबाळकरांच्या हस्ते विशेष सत्कार!
​तुळजापूर प्रतिनिधी:-
NEET-2026 या राष्ट्रीय पातळीवरील कठीण परीक्षेत ओबीसी प्रवर्गातून ऑल इंडिया रँक २४७ मिळवत धाराशिव जिल्ह्याचे नाव देशात उज्ज्वल करणाऱ्या कु. पारस महावीर कंदले याच्या यशाचा डंका आता थेट ‘एम्स ऋषिकेश’पर्यंत पोहोचला आहे. देशातील अत्यंत नामांकित वैद्यकीय संस्थेत प्रवेश निश्चित झाल्याबद्दल पारस कंदले याचा धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे दिमाखदार सत्कार करण्यात आला.
​पारस हा सर्वसामान्य आणि कष्टकरी कुटुंबातील मुलगा आहे. त्याचे वडील महावीर कंदले हे कुमाळवाडी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे आरोग्य कर्मचारी म्हणून सेवा बजावत आहेत, तर आई सुनीता कंदले या सारोळा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आणि आई-वडिलांनी शिक्षणासाठी घेतलेल्या अपार कष्टांचे चीज करत पारसने हे उत्तुंग यश संपादन केले आहे. त्याच्या या यशामुळे धाराशिव जिल्ह्याच्या शैक्षणिक वैभवात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
​जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उमेशराजे निंबाळकर यांच्या शुभहस्ते पारसचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मेहबूब पाशा पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती, तसेच दिलदार लायक अली पटेल यांच्यासह पक्षातील इतर मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
​यावेळी बोलताना मान्यवरांनी, “पारसचे हे यश जिल्ह्यातील इतर अनेक ग्रामीण आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल,” असा विश्वास व्यक्त केला आणि त्याच्या भावी वैद्यकीय वाटचालीस व उच्च शिक्षणासाठी उदंड शुभेच्छा दिल्या.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india