Best News Portal Development Company In India

माधवराव पाटील महाविद्यालयात स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्यावर विशेष व्याख्यान संपन्न.

माधवराव पाटील महाविद्यालयात स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्यावर विशेष व्याख्यान संपन्न.
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगरच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागांतर्गत आणि श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या पत्रकारिता प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या वतीने शुक्रवारी (दि. ११) रोजी विश्वबंधुत्व दिनानिमित्त स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्यावर एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र संशोधन केंद्र सभागृहात आयोजित या कार्यक्रमात स्वामी विवेकानंद व्यक्ती आणि विचार या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. ​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कंटेकूरचे मुख्याध्यापक लक्ष्मीकांत पटणे, शाळेचे सहशिक्षक जीवन सूर्यवंशी यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर प्रा. डॉ. सतीश शेळके, प्रा. डॉ. राम बजगिरे यांची उपस्थिती होती.
विस्तार सेवा केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. महेश मोटे यांनी आपल्या प्रास्ताविकात विश्वबंधुत्व दिनाचे औचित्य आणि स्वामी विवेकानंदांच्या विचारांची आजच्या काळातील सुसंगतता स्पष्ट केली.
चौकट : ​प्रमुख अतिथी आणि वक्ता म्हणून बोलताना लक्ष्मीकांत पटणे यांनी स्वामी विवेकानंदांच्या तरुण मनातील जिद्द, त्यांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, राष्ट्रप्रेम आणि विश्वबंधुत्वाचा संदेश यावर प्रकाश टाकला. युवकांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांना आपल्या जीवनात आचरणात आणून देश विकासात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
चौकट : ​अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा वैचारिक कार्यक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. स्वामींचे विचार तरुणांना योग्य दिशा देणारे ठरतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुजित मटकरी तर आभार प्रा. डॉ. मुकुंद धुळेकर यांनी मानले. या व्याख्यानाला महाविद्यालयातील विविध शाखांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच पत्रकारिता प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे व विस्तार केंद्राचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail