मावेजा वाटपात दुजाभाव न करता टॉवर लाईन मुळे बाधित जमिनीचा अपुरा मावेजा वाढवून समान दराने मावेजा द्यावा : वागदरी येथील शेतकऱ्याची मागणी
————————————————
नळदुर्ग (एस.के.गायकवाड) :
सोलारक्राफ्ट इंडिया ७ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी च्या टावर उभारणीमुळे व टॉवर लाईनमुळे बाधिती जमिनीचा अपूरा मावेजा वाढवून शेतकऱ्यांमध्ये दुजाभाव न करता समान दराने मावेजा द्यावा अशी मागणी वागदरी ता.तुळजापूर येथील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी कार्यालय धाराशिव यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत वागदरी ता. तुळजापूर येथील शेतकरी रावण राजेंद्र पवार, शिवराम विश्वंभर पवार, संजय विश्वंभर पवार,बाळू विश्वंभर पवार राहणार वागदरी ता.तुळजापूर यांनी उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी धाराशिव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की श्री मोहम्मद यहया ऑथराईजड सिग्निटरी सोलार क्राफ्ट इंडिया ७ प्रायव्हेट लिमिटेड (ब्लूपाईन ) या सोलार कंपनी ने आमच्या मालकी हक्काच्या गट नं ६० मधिल शेत जमिनीतून (१३२kv, २२okv, ४ooKv) क्षमतेचे उच्चदाब विद्यूत वाहिनी घेवून गेली आहे.सदर कंपनीचा आमच्या क्षेत्रात टॉवर उभारला असून विद्यूत वहाक तारा आमच्या पपईच्या बागेवरून व ऊसाच्या पिकावरून गेल्या आहेत. त्याच तारेखाली बोअरवेल व बोअरवेचे पाईप आहेत. तर संजय विश्वंभर पवार यांची स्वतंत्र बोअरवेल आहे.आपल्या टॉवरमुळे व विद्यूत वहाक तारे मुळे आमच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे व पुढे होणार आहे.
आमच्या शेतातून गेलेल्या टॉवर व टॉवर लाईन मुळे बाधित झालेल्या जमिनीचा दिलेला मावेजा हा अपुरा असून याच शिवारातील काही शेतकऱ्यांना आमच्यापेक्षा जास्त मावेजा दिलेला असून त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत तरी शेतकऱ्यांमध्ये असा दुजाभाव न करता भारतीय टेलिग्राम कायदा १८८५ कलम १० आणि विद्युत कायदा कलम २००३ ६०/ ६ ८ अन्वये टॉवरच्या पायासाठी बाजारभावाच्या मूल्यांकप्रमाणे सरसकट 100% दराने तर कॅरीडोर (तारेखाली) साठी 50 टक्के दराने व पपई पिकांच्या तीन वर्षाचे उत्पादन गृहीत धरून वेगळा मावेजा वाढवून सर्व शेतकऱ्यांना द्यावा.अन्यथा या संदर्भात आंदोलन करण्यात येईल.
उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी कार्यालय धाराशिव यांना देण्यात आलेल्या निवेदनावर रावण राजेंद्र पवार शिवराम विश्वंभर पवार संजय विश्वंभर पवार बाळू विशंभर पवार आधी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.






