धार्मिक कार्यक्रमाला गेलेल्या तरुणाला मारहाण; अतिक्रमणाच्या गैरसमजातून पेटवून दिली ३ लाखांची कार!
तुळजापूर प्रतिनिधी:-
धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेल्या एका व्यक्तीला अतिक्रमण करत असल्याच्या गैरसमजातून अज्ञातांनी शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना निपाणी हासेगाव (गौरगाव) येथील वनविभागाच्या हद्दीत घडली आहे. एवढेच नव्हे तर, अज्ञात समाजकंटकांनी फिर्यादीची मारुती स्विफ्ट कार तोडून आणि जाळून खाक केली असून, यात सुमारे ३ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याप्रकरणी शिराढोण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी सरदार उमराव चव्हाण (वय ३२ वर्षे, रा. माळकरंजा, ता. कळंब, जि. धाराशिव) हे दिनांक ११ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास निपाणी हासेगाव येथील गौरगाव वनविभागाच्या जमिनीत एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी तेथे आलेल्या काही अज्ञात व्यक्तींचा, सरदार चव्हाण हे वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करण्यासाठी आले असल्याचा गैरसमज झाला.
याच चुकीच्या समजातून अज्ञात आरोपींनी त्यांना अकारण शिवीगाळ करत मारहाण केली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी रागाच्या भरात सरदार चव्हाण यांची मारुती स्विफ्ट कार (क्र. MH 48 F 2875) ची बेदम तोडफोड केली आणि गाडीला आग लावून ती जाळून टाकली. या संपूर्ण घटनेत फिर्यादीचे तब्बल ३,००,००० रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे.
या गंभीर प्रकारानंतर फिर्यादी सरदार चव्हाण यांनी दुसऱ्या दिवशी, दिनांक १२ सप्टेंबर २०२६ रोजी शिराढोण पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रथम खबरीवरून शिराढोण पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२३, ३२४(५), ३५१(२), आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे.






