धाराशिवचे सुपुत्र शंकर कसबे यांना प्रतिष्ठेचा ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर!
तुळजापूर प्रतिनिधी:-
सिंदफळ (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) येथील सरस्वती प्रशालेचे उपक्रमशील सहशिक्षक श्री. शंकर अभिमान कसबे यांना महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, बाळे (सोलापूर) यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘कै. मातोश्री निर्मलाताई राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार (२०२५-२६)’ जाहीर झाला आहे. त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ (बाळे) या संस्थेच्या प्रेरणास्थान आणि माजी आमदार कै. निर्मलाताई शंकरराव टोकळ यांच्या स्मरणार्थ शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय आणि समाजासाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या राज्यातील उपक्रमशील व गुणवंत शिक्षकांना या पुरस्काराने गौरविण्यात येते. शिक्षक दिनाचे औचित्य साधून श्री. कसबे यांच्या शैक्षणिक योगदानाची दखल घेत त्यांची या अत्यंत मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. सचिन टोकळ आणि सचिव मा. सौ. शिल्पाताई टोकळ यांनी एका अधिकृत निवड पत्राद्वारे ही आनंदवार्ता कळवली असून, पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांना सहकुटुंब, मित्रपरिवार आणि शाळेच्या स्टाफसह उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे.
दिनांक: १६ सप्टेंबर २०२६
वेळ: सकाळी १०:३० वाजता
स्थळ: जनाई सभागृह, तुळशीदास नगर, बाळे, सोलापूर.
सत्कारमूर्तींसाठी नाव नोंदणी व फेटा बांधण्याची वेळ सकाळी १०:०० ते १०:३० अशी ठेवण्यात आली असून, सर्वांनी अर्धा तास अगोदर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या शानदार कार्यक्रमानंतर ज. रा. चंडक प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
श्री. शंकर कसबे यांच्या या गौरवामुळे सरस्वती प्रशाला, सिंदफळ आणि तुळजापूर तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.







