तुळजाभवानी मंदिर परिसरात श्री गणेशाची विधिवत प्राणप्रतिष्ठापना; कर्मचाऱ्यांना वृक्षवाटप करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश!
तुळजापूर प्रतिनिधी:-
श्री तुळजाभवानी मंदिर परिसरातील श्री गणेश विहारामध्ये आज अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात श्री गणेशाची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. तहसीलदार तथा मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांच्या शुभहस्ते हा धार्मिक विधी वेदोक्त मंत्रोच्चारात पार पडला.
श्री गणेशाच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर मंदिर प्रशासनाच्या वतीने एक स्तुत्य व पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आला. तहसीलदार माया माने यांच्या हस्ते मंदिर संस्थानमधील कर्मचाऱ्यांना विविध वृक्षांच्या रोपांचे वाटप करण्यात आले. धार्मिक परंपरा जपण्यासोबतच निसर्ग संवर्धनाचा मोलाचा संदेश या प्रसंगी देण्यात आला.
या धार्मिक व सामाजिक सोहळ्यास मंदिर संस्थानचे अधिकारी, कर्मचारी तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहायक व्यवस्थापक: जयसिंग पाटील
धार्मिक व्यवस्थापक: रामेश्वर वाले
प्रमुख उपस्थिती: बंडू पाठक, महेंद्र आदमाने, ऋषभ रेहपांडे, ओम खुरुद, अमोल कर्डिले, रविराज गायकवाड, रमेश कवडे, गणेश नाईकवाडी आणि सचिन साळुंके.
यावेळी श्री गणेशाच्या जयघोषाने संपूर्ण गणेश विहार परिसर दुमदुमून गेला होता, तर भाविकांनी या नयनरम्य सोहळ्याचा आणि दर्शनाचा लाभ घेतला.








