परंडा: बेकायदेशीर बैलगाडा शर्यतीवरून दोन गटांत तुफान राडा; दगड-काठ्यांनी मारामारीत ४ जण जखमी, २८ जणांवर गुन्हा दाखल!
तुळजापूर प्रतिनिधी:-
परंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माणकेश्वर येथे कोणतीही पूर्वपरवानगी न घेता आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीवरून दोन गटांत जोरदार वाद होऊन सार्वजनिक ठिकाणी तुफान मारामारी झाल्याची घटना घडली आहे. या हिंसक घटनेत ४ जण जखमी झाले असून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी २८ जणांवर परंडा पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक १२ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास माणकेश्वर ते शेकापूर जाणाऱ्या रस्त्यालगत प्रशासनाची कोणतीही वैध परवानगी न घेता बेकायदेशीरपणे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीच्या कारणावरून तेथे जमलेल्या दोन गटांतील व्यक्तींमध्ये सार्वजनिक रस्त्यावरच आपसात तीव्र वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन दोन्ही गटांनी एकमेकांवर दगड आणि काठ्यांनी हल्ला केला.
गटागटांत झालेल्या या मारामारीत माणिक देवकते, मुबीन कुरेशी, तालीब कुरेशी आणि आशीफ कुरेशी हे चौघे जखमी झाले आहेत. सार्वजनिक ठिकाणी झालेल्या या दगडफेक व हाणामारीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण होऊन शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला.
या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार सुशीलकुमार कोळेकर यांनी १३ सप्टेंबर २०२६ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून (FIR) खालील संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजाभाऊ सौदागर दणाने, किसन अंधारे, राज अंधारे, अतुल मोरे, आखली बादेला, अमोल अंधारे, सुधीर दणाने, सचिन क्षीरसागर, मिनाज पटेल, राहुल जैन, अजित जैन, अनिस कुरेशी, माणिक देवकते, मुबीन कुरेशी, तालीब कुरेशी, आशीफ कुरेशी, अतुल अंधारे, शाहरुख कुरेशी, इसुफ कुरेशी, आजम कुरेशी, नाजम कुरेशी, शबीर कुरेशी, मुकुंद यादव, समाधान सुदाम आगवणे, अजय कल्याण देवकते, कृष्णा देवकते, अजित माळी, संकेत अंधारे (सर्व रा. माणकेश्वर, ता. भूम, जि. धाराशिव).
भारतीय न्याय संहिता (BNS): कलम ११८(१), ११५(१), १२५, १९४(२)
प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक अधिनियम: कलम ३(२), ३(३)
महाराष्ट्र पोलीस अधिनियम: कलम १३५
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता परंडा पोलीस ठाण्याचे पथक या प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास करत आहे.






