*श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील तीन संशोधकांना पेटंट मंजूर*
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
भारत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, उमरगा येथील प्राध्यापकांच्या संशोधनकार्याला उल्लेखनीय यश मिळाले असून डॉ. व्ही. एस. सूर्यवंशी यांना दोन, तर डॉ. व्ही. डी. देवरकर आणि डॉ. ए. एस. पदमपल्ले यांना प्रत्येकी एक पेटंट प्राप्त झाले आहे. यापैकी एक पेटंट भारतीय पेटंट प्राधिकरणाकडून, तर दुसरे यूके पेटंट प्राधिकरणाकडून मंजूर झाले आहे. या उल्लेखनीय उपलब्धीबद्दल महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व संशोधन आणि विकास कक्षाच्या वतीने प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्राध्यापकांच्या संशोधनवृत्तीला प्रोत्साहन देणारी ही कामगिरी असून महाविद्यालयाच्या संशोधनपरंपरेसाठी महत्त्वपूर्ण आहे. अध्यापनासोबतच नाविन्यपूर्ण संशोधन, तंत्रज्ञानविकास आणि समाजोपयोगी उपक्रमांमध्ये महाविद्यालयातील प्राध्यापकांचा वाढता सहभाग अधोरेखित करणारी ही उपलब्धी आहे. महाविद्यालयायीन पातळीवर हे अकरावे पेटंट असून भविष्यात सर्वच क्षेत्रात पेटंट मिळवण्यासाठी सर्व शाखांतील प्राध्यापकांनी प्रयत्न करावेत असे आवाहन यावेळी प्राचार्य डॉ संजय अस्वले यांनी केले.
प्राप्त पेटंटपैकी एक महत्त्वपूर्ण पेटंट “इंप्रूव्हड प्रोसेस फॉर प्रिपेरिंग नेफोपाम हायड्रोक्लोराइड बाइ सिलेक्टिव्ह लो टेम्परेचर मोनोटोसिलेशन अँड इन्सिटू एमिनेशन” या डॉ व्ही. एस. सूर्यवंशी (रसायनशास्त्र) यांच्या संशोधनासाठी मंजूर झाले आहे. नेफोपाम हायड्रोक्लोराइड हे तीव्र स्वरूपाच्या वेदना कमी करण्यासाठी वापरले जाणारे औषध आहे. शस्त्रक्रियेनंतरच्या वेदना, दाताच्या वेदना, स्नायू व हाडांच्या वेदना तसेच काही इतर तीव्र स्वरूपाच्या वेदनांच्या व्यवस्थापनामध्ये त्याचा उपयोग केला जातो. या औषधाच्या निर्मितीसाठी अधिक परिणामकारक, कमी टप्प्यांची आणि पर्यावरणपूरक असलेली रासायनिक प्रक्रिया विकसित करण्याच्या दृष्टीने सदर संशोधन करण्यात आले आहे. या सुधारित प्रक्रियेमुळे औषधनिर्मिती अधिक कार्यक्षम, तुलनेने कमी खर्चिक आणि पर्यावरणपूरक होणार आहे.
या पेटंट मध्ये डॉ.सूर्यवंशी यांनी विविध आणि नाविन्यपूर्ण दहा बाबींचा दावा केला आहे. तसेच डॉ. सूर्यवंशी यांनी डॉ. व्ही. डी. देवरकर (वनस्पतीशास्त्र) आणि डॉ ए. एस. पदमपल्ले (भौतिकशास्त्र) यांच्या समवेत विकसित केलेल्या “पीएच रिस्पॉन्स मॅपिंग डिव्हाइस”लाही पेटंट मिळाले आहे. विविध प्रकारच्या पर्यावरणाच्या परिस्थितींमध्ये होणाऱ्या सामु/पीएच मधील बदलांचे मॅपिंग, त्याचे जलिय प्राणी तसेच वनस्पती जीवनावर होणारे परिणाम, पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेचे विश्लेषण, त्याबद्दल जागरूकता आणि उपचारासाठी हे उपकरण उपयुक्त ठरणार आहे. या उपकरणांमध्ये संकलित केलेल्या माहितीच्या आधारे वेगवेगळ्या भौगोलिक स्थानांमधील पाण्याची सामू/पीएच पातळी कशी बदलते, याचा अचूक मागोवा घेऊन, त्याचा आलेख, रंगीत नकाशा तयार करून जनजागृती व उपायांच्या आधारे जलप्रदूषण रोखण्यास मदत होणार आहे.
या उपकरणाच्या विकासातून आंतरशाखीय संशोधनाचे महत्व अधोरेखित होते.
या उल्लेखनीय यशाबद्दल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. अमोलराव मोरे, उपाध्यक्ष मा. अश्लेष मोरे, सरचिटणीस मा. जनार्धनराव साठे, चिटणीस मा. पद्माकराव हराळकर, सहचिटणीस डॉ. सुभाष वाघमोडे आणि सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन करून भविष्यातही महाविद्यालयातून अधिकाधिक नाविन्यपूर्ण संशोधन व पेटंटनिर्मिती व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच उपप्राचार्य डॉ पद्माकर पिटले, प्रा. जी. एस. मोरे, पर्यवेक्षक प्रा एस. ए. महामुनी, प्रभारी प्राध्यापक डॉ एस. पी. इंगळे, प्रा डी बी लोभे, प्रबंधक राजकुमार सोनवणे, कार्यालयीन अधिक्षक नितीन कोराळे, सर्व विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.









