Best News Portal Development Company In India

बनावट दिव्यांग कार्डने एसटीची फसवणूक; महिला वाहकाला निलंबनाची धमकी देणाऱ्या दोघांवर तुळजापुरात गुन्हा दाखल !

बनावट दिव्यांग कार्डने एसटीची फसवणूक; महिला वाहकाला निलंबनाची धमकी देणाऱ्या दोघांवर तुळजापुरात गुन्हा दाखल !

​तुळजापूर प्रतिनिधी:-
एसटी महामंडळ व शासनाची फसवणूक करण्यासाठी बनावट दिव्यांग ओळखपत्राचा वापर करणे, एसटी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देणे आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छगन बापुराव लोखंडे आणि राम शिंदे (दोघे रा. आंबेजवळगे, ता. जि. धाराशिव) अशी आरोपींची नावे आहेत.

​बनावट ५३% अपंगत्व कार्डचा गैरवापर
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ६:३५ ते ७:१५ वाजेच्या सुमारास कावलदरा ते तुळजापूर बसस्थानकादरम्यान घडली. धाराशिव आगाराचे एसटी चालक उमेश दिलीप पवार (वय ४४, रा. भवानी नगर, धाराशिव) हे नेहमीप्रमाणे बस घेऊन जात असताना आरोपींनी प्रवासादरम्यान ५३ टक्के शारीरिक दुर्बलतेचे (वन फोर सवलतीचे) बनावट ओळखपत्र दाखवले. या बनावट प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी एसटी administration व शासनाची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केला.

​महिला वाहकावर दबाव अन् जिवे मारण्याची धमकी-
प्रवासादरम्यान कार्डबाबत विचारणा केली असता, आरोपींनी चालक उमेश पवार आणि महिला वाहकास अवाच्य भाषेत शिवीगाळ केली. “माझे कार्ड परत दे, नाहीतर तुला या रोडवर ड्युटी करू देणार नाही” असे म्हणून आरोपींनी बस अडवली व जिवे मारण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणला.

​एवढ्यावरच न थांबता आरोपींनी महिला वाहकाशी अरेरावी करत “तुम्ही वरिष्ठांचे आदेश पाळत नाहीत का?” असा जाब विचारला. नोकरीवरून निलंबित करण्याची धमकी देऊन व दबाव आणून बनावट कार्डवरच सवलतीचे तिकीट काढण्यास भाग पाडले.
​
या प्रकरणी एसटी चालक उमेश पवार यांनी १७ सप्टेंबर २०२६ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या फिर्यादीवरून आरोपी छगन लोखंडे व राम शिंदे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) मधील खालील कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
​दाखल कलमे- भा.न्या.सं. कलम १३२, २२१, २३८, ३१८(४), ३३६(३), ३४०(२), १२६, ३५१(२)(३), ३५२ आणि ३(५).

​शासकीय कर्मचाऱ्यांवर दबाव आणून फसवणूक करणाऱ्या या भामट्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात असून, तुळजापूर पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india