कळंबजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह आरोपी गजाआड!
तुळजापूर प्रतिनिधी:-
२६ हजार रुपयांचे अवैध शस्त्र जप्त; पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली भाटसांगवी पाटीवर रचला सापळा. स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी.
धाराशिव जिल्ह्यात अवैध शस्त्रास्त्रांविरोधात पोलिसांनी कडक पावले उचलली असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने १९ सप्टेंबर रोजी एक मोठी आणि महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. भाटसांगवी पाटीजवळ बेकायदेशीररीत्या गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले.
गोपनीय बातमीवरून रचला सापळा
जिल्ह्यात चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे आणि अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांचे पथक कळंब परिसरात गस्तीवर होते.
गस्त सुरू असताना, कळंब चौकात पथकाला एका खबऱ्यामार्फत गोपनीय बातमी मिळाली की, भाटसांगवी पाटीजवळ एक इसम संशयितरीत्या थांबला असून त्याच्याकडे गावठी पिस्टल आहे.
माहिती मिळताच पथकाने क्षणाचाही विलंब न लावता वरिष्ठांना कळवून दुपारी ४:०० वाजेच्या सुमारास भाटसांगवी पाटी येथे छापा टाकला. तेथे बातमीतील वर्णनाचा इसम दिसताच पोलीस पथकाने गाडीतून उतरून त्याला चौफेर घेराव घालत शिताफीने ताब्यात घेतले.
पोलिसांनी नाव विचारले असता त्याने आपले नाव नवनाथ उर्फ बालाजी बब्रुवान काळे (रा. भाटसांगवी, ता. कळंब, जि. धाराशिव) असे सांगितले. त्याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेला खोवलेले लाकडी ग्रीप असलेले लोखंडी धातूचे एक गावठी पिस्टल आणि एक जिवंत काडतूस (एकूण किंमत ₹२६,०००/-) मिळून आले.
जप्त करण्यात आलेल्या अवैध शस्त्रांसह आरोपीची तात्काळ वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये पोलीस ठाणे कळंब येथे गुन्हा नोंदवून त्यास पुढील न्यायालयीन व कायदेशीर कारवाईसाठी कळंब पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सपोनि अमोल मोरे, पोलीस अंमलदार अमोल चव्हाण, राहुल नाईकवाडी, बळीराम शिंदे, चालक पोलीस अंमलदार दहीहांडे तसेच आरसीपी (RCP) पथकातील ४ पोलीस अंमलदारांनी यशस्वीपणे पार पाडली. स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडाकेबाज कारवाईमुळे बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.







