Best News Portal Development Company In India

धाराशिवच्या आठही तालुक्यांत तीव्र दुष्काळ; तातडीने ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा पाठपुरावा !

धाराशिवच्या आठही तालुक्यांत तीव्र दुष्काळ; तातडीने ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा पाठपुरावा !

तुळजापूर प्रतिनिधी:- धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाचे गडद सावट निदर्शनास येत आहे. ​IIT मुंबईचे तज्ज्ञ व शास्त्रज्ञांच्या पाहणीनंतर शासनाकडे सविस्तर अहवाल सादर
​चारा डेपो, टँकर आणि रोजगार हमीच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य.
​खरीप नुकसानीचे अनुदान आणि पीकविमा मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न.
​
जिल्ह्यात पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे खरीप पिकांची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून आठही तालुक्यांत तीव्र दुष्काळाचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात तातडीने ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर व्हावा, यासाठी आवश्यक तांत्रिक बाबींची पूर्तता करून शासनस्तरावर तीव्र पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

​धाराशिव तालुक्यातील उपळा शिवारात ग्रामस्थ व शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत आयोजित ‘घोंगडी बैठकीत’ ते बोलत होते. बैठकीनंतर आमदार पाटील यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पावसाच्या खंडामुळे होरपळलेल्या खरीप पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

​शास्त्रज्ञ व ‘IIT’ तज्ज्ञांकडून प्रथमच वस्तुनिष्ठ पंचनामे-
​जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीचा अचूक आणि तांत्रिक अहवाल शासनासमोर मांडण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. प्रथमच कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, मुंबई येथील ‘आयआयटी’चे (IIT Bombay) वरिष्ठ तज्ज्ञ, तसेच महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने प्रत्यक्ष शिवारात जाऊन पाहणी केली आहे. पिकांची सद्यस्थिती, पावसाचा खंड आणि संभाव्य नुकसान यावर आधारित सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. या तांत्रिक अहवालाचा मोठा फायदा आगामी काळात नुकसानभरपाई आणि मदत निश्चित करताना होणार आहे.
​प्रशासनाला दिलेले मुख्य निर्देश व उपाययोजना
​दुष्काळाच्या या कठीण काळात शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाला खालीलप्रमाणे उपाययोजनांचे निर्देश देण्यात आले आहेत.

​पाणीटंचाई व टँकर व्यवस्था- ज्या भागांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे, तेथे तातडीने टँकर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.
​चारा डेपोची पूर्वतयारी: पावसाअभावी पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होऊ नये म्हणून जिल्ह्यात ‘चारा डेपो’ सुरू करण्याची पूर्वतयारी पूर्ण झाली असून, गरजेनुसार तातडीने निर्णय घेतला जाईल.
​’रोहयो’तून हाताला काम: दुष्काळामुळे शेतीचे उत्पन्न थांबल्याने कुटुंबांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणावर ‘रोजगार हमी योजनेची’ (MGNREGA) कामे हाती घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

​अनुदान आणि पीकविमा तातडीने मिळवणार
​नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रथम खरीप नुकसानीचे शासकीय अनुदान आणि पाठोपाठ पीकविम्याची भरपाई लवकरात लवकर खात्यावर जमा व्हावी, यासाठी सरकार दरबारी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे आश्वासन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी या वेळी दिले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail