तुळजापूरसह संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करा; काँग्रेस आक्रमक, तहसीलदारांना दिले निवेदन!
हेक्टरी १ लाख रुपये मदत, कर्जमाफी आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्याची मागणी; उग्र आंदोलनाचा इशारा!
तुळजापूर (विशेष प्रतिनिधी):-
तुळजापूर तालुक्यासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, उडीद, बाजरी, मका आणि द्राक्ष बागांसह सर्व पिके पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. या बिकट परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, पंचनाम्याचा किंवा कापणी प्रयोगाचा कोणताही देखावा न करता शासनाने संपूर्ण जिल्ह्यात तात्काळ ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना मदत करावी, अशी ठाम मागणी काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात जिल्हाधिकारी मा. श्री. किर्ती कुमार पुजार यांच्या नावे असलेले निवेदन तुळजापूरचे तहसीलदार मा. श्री. अरविंद बोळंगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. शासनाने या मागण्यांची तात्काळ दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदनातील प्रमुख १० मागण्या-
तात्काळ दुष्काळ जाहीर करा- पावसाअभावी पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने कोणत्याही औपचारिक निकषांची वाट न पाहता तुळजापूर तालुक्यासह धाराशिव जिल्ह्यात तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात यावा.
प्रति हेक्टरी १ लाख रुपये मदत- संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी प्रति हेक्टरी १ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य द्यावे.
कर्जमाफी व नवीन पीककर्ज- सर्वसमावेशक कर्जमाफी योजना लागू करून शेतकऱ्यांना तात्काळ नवीन पीककर्ज उपलब्ध करून द्यावे आणि चालू पीककर्जाचे व्याज माफ करावे.
प्रोत्साहनपर अनुदानात वाढ- नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहनपर अनुदान ५० हजार रुपयांवरून थेट १ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात यावे.
पीक विमा भरपाई- पीक विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी.
चारा छावण्या व पिण्याचे पाणी- जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची आणि चारा छावण्यांची तात्काळ उभारणी करावी.
‘रोहयो’ची कामे सुरू करा- ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळण्यासाठी रोजगार हमी योजनेची कामे तात्काळ सुरू करण्यात यावीत.
विहीर व बोर अधिग्रहण- बोरी धरणात केवळ ७% मृत पाणीसाठा शिल्लक राहिल्याने तुळजापूर व नळदुर्ग शहरासह ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे गरजेनुसार विहिरी व बोर अधिग्रहण करून पाणी पुरवठा करावा.
विद्यार्थ्यांना सवलती व मोफत पास- विद्यार्थ्यांची शालेय फी व शिष्यवृत्ती माफ करावी तसेच एसटी महामंडळाचा प्रवास पास मोफत देण्यात यावा.
महिला बचत गटांचे व्याज माफ- तालुक्यातील महिला शेतकरी बचत गटांची कर्ज वसुली थांबवून त्यांचे व्याज माफ करण्यात यावे.
प्रमुख उपस्थिती- तहसीलदार यांना शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत निवेदन देतेवेळी काँग्रेसचे धाराशिव जिल्हाध्यक्ष उमेशराजे निंबाळकर, तुळजापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. अरविंद बेडगे, कार्याध्यक्ष अमोल कुतबळ आणि धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष ॲड. धिरज आ. पाटील यांच्यासह काँग्रेसचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







