Best News Portal Development Company In India

वागदरी येथील पुरातन महादेव मंदिराच्या जीर्णोद्धार कामासाठी दिलेली देणगी वैयक्तिक व्यक्तीच्या खिशात : मंदिर समिती व भाविक भक्त ग्रामस्थांचा विश्वासघात करून मोठी आर्थिक फसवणूक नळदुर्ग पोलिसात तक्रार दाखल!

वागदरी येथील पुरातन महादेव मंदिराच्या जीर्णोद्धार कामासाठी दिलेली देणगी वैयक्तिक व्यक्तीच्या खिशात : मंदिर समिती व भाविक भक्त ग्रामस्थांचा विश्वासघात करून मोठी आर्थिक फसवणूक नळदुर्ग पोलिसात तक्रार दाखल
——————————–
नळदुर्ग (एस.के.गायकवाड ): तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथील गावात असलेले पुरातन हेमाडपंथी महादेव मंदिराच्या जीर्णोद्धार कामासाठी विश्वासाने दिलेली देणगीची रक्कम वैयक्तिक व्यक्तीच्या खिशात जमा झाली असून याबाबत विचारणा केली असता सदर देणगीची रक्कम ही माझ्या वैयक्तिक मंदिरासाठी दिलेली आहे यात गावचा काही संबंध नाही असे म्हणून त्या व्यक्तीने समस्त ग्रामस्थांचा विश्वासघात करून मोठी आर्थिक फसवणूक केली असून सदर प्रकरणी नळदुर्ग पोलिसात सर्व ग्रामस्थांच्या वतीने तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

. या बाबत वागदरी ग्रामस्थांच्या वतीने नळदुर्ग पोलीस ठाणे येथे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की मौजे वागदरी ता.तुळजापूर शिवारात ब्ल्यू पाईन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चे २२० केव्हीचे टॉवर लाईन चे काम चालू आहे.त्या कंपनीच्या वतीने गावातील पुरातन महादेव मंदिराच्या जीर्णोद्वार कामासाठी गावकऱ्यांनी काहीतरी देणगी देण्याचा प्रस्ताव कंपनीकडे ठेवला होता.ग्रामस्थांच्या प्रस्तावाचा विचार करून देवस्थानाच्या जीर्णोद्धारासाठी सदर कंपनीने देणगीच्या स्वरूपात पाच लाख रुपये मंजूर केले. सदर पाच लाख रुपयाचा धनादेश गावातील जितेंद्र सुरेश पाटील या व्यक्तीवर विश्वास ठेवून त्यांच्या नावे दिला.

चेक हातात मिळताच त्या व्यक्तीची भावना बदलली आणि त्याने सदर पाच लाखाची देणगी ही गावातील सार्वजनिक पुरातन महादेव मंदिराच्या जीर्णोद्धार कामासाठी दिलेली नसून ती माझ्या वैयक्तिक मंदिराच्या विकास कामासाठी दिलेली आहे असे म्हणून सदर रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहे.
याबाबत सर्वतोपरी सदर व्यक्तीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु त्यांनी सदर पाच लाख रुपयाची रक्कम गावच्या मंदिराच्या कामासाठी देण्याचे स्पष्ट नकार देऊन कंपनीने आणि ग्रामस्थांनी त्याच्यावर टाकलेला विश्वासाचा विश्वासघात केला आणि सर्व ग्रामस्थां ची
मोठी आर्थिक फसवणूक केली आहे.

सदर प्रकरणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने एक तक्रारी अर्ज नळदुर्ग पोलीस ठाणे येथे देण्यात आला असून नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी अर्ज स्वीकारला असून यावर यावर वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी ग्रामस्थांना दिले.

याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजी मिटकर गुरुजी ह.भ.प.राजकुमार पाटील माजी सरपंच तथा तंटा मुक्त गाव समिती अध्यक्ष राजकुमार पवार, ग्रा.प. सदस्य ज्ञानेश्वर पाटील, मदन पाटील ग्रा.प. सदस्य अमोल पवार, पोलीस पाटील बाबुराव बिराजदार, फत्तेसिंग ठाकूर,महादेव बिराजदार,
भगतसिंग ठाकूर,रामचंद्र यादव,व्यंकट पाटील,दत्ता पाटील,रामसिंग चव्हाण, ज्ञानोबा सुरवसे,यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india