Best News Portal Development Company In India

माधवराव पाटील महाविद्यालयात उत्साहात रंगले कवी संमेलन नामवंत कवींच्या बहारदार काव्यवाचनाने रसिकांची मने जिंकली

माधवराव पाटील महाविद्यालयात उत्साहात रंगले कवी संमेलन
नामवंत कवींच्या बहारदार काव्यवाचनाने रसिकांची मने जिंकली

उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

मुरुम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात अंतर्गत गुणवत्ता आश्वासन कक्ष, सांस्कृतिक विभाग आणि मुरूम येथील श्रीराम गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कवी संमेलन मंगळवार (दि २२) रोजी उत्साहात पार पडले. विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि समकालीन विषयांवरील कवितांच्या प्रभावी सादरीकरणामुळे सभागृहात काव्यरसाची मैफल रंगली. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार होते. यावेळी उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण, संस्थेचे संचालक प्रा. डॉ. सतीश शेळके, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश्वर होगाडे, मुख्याध्यापक उल्हास घुरघुरे, श्रीराम गणेश मंडळाचे अध्यक्ष श्रीराम कुलकर्णी, डॉ. रवींद्र गायकवाड, प्रा. गोपाळ कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

चौकट : कविवर्य गणेश घुले (छत्रपती संभाजीनगर) यांनी आपल्या प्रभावी शैलीत काव्यवाचन करीत बालमन, शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आशय मांडला. आशयघन, संवेदनशील, वास्तववादी कवितांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या कवितांमधून माणुसकी, सामाजिक वास्तव, नातेसंबंध, संघर्ष, प्रेम आणि जीवनमूल्यांचे प्रभावी दर्शन घडले. शब्दांतील साधेपणा आणि आशयातील प्रभावीपणा यामुळे त्यांच्या कवितांना उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.
“शब्दांतून वास्तवाचे प्रतिबिंब आणि कवितेतून माणुसकीचा हुंकार” अशी त्यांच्या काव्यवाचनाची अनुभूती उपस्थितांना आली. सामाजिक जाणिवा आणि मानवी संवेदनांना स्पर्श करणाऱ्या त्यांच्या कवितांनी कार्यक्रमात विशेष रंग भरला.

चौकट : डॉ. स्वप्नील चौधरी (पुणे) यांनी सामाजिक वास्तव आणि समकालीन प्रश्नांना भिडणाऱ्या कवितांचे सादरीकरण केले. त्यांच्या चर्चेत असलेल्या ‘चल दंगल समजून घेऊ’ या रचनेने सामाजिक प्रश्नांकडे चिकित्सक दृष्टीने पाहण्याचा संदेश दिला. त्यांच्या प्रभावी सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद दिला.

चौकट : कवी संतोष नारायणकर (परभणी) यांनी आपल्या खास ग्रामीण बोलीतील विनोदी आणि आशयपूर्ण शैलीने वातावरणात रंगत आणली. ‘मामाला माझ्या’ या लोकप्रिय रचनेतील “मामाला माझ्या दोन होत्या पोरी, एक होती काळी एक होती गोरी…” या ओळींनी सभागृहात हास्याची लकेर उमटली. त्याचबरोबर त्यांच्या कवितेतून ग्रामीण जीवन, मानवी नातेसंबंध आणि सामाजिक वास्तवाचे विविध पैलू प्रभावीपणे समोर आले.

चौकट : कवी श्रीराम पोतदार (पुणे) यांनी या कवी संमेलनात समाज, संस्कृती, पर्यावरण, युवकांचे प्रश्न, स्त्रीशक्ती, शेतकरी, ग्रामीण जीवन, मानवी नाती, प्रेम, विद्यार्थी आणि शिक्षक, समकालीन सामाजिक वास्तव अशा विविध विषयांवर काव्यरूपी भाष्य करण्यात आले. चारही कवींनी आपल्या स्वतंत्र शैलीत कविता सादर केल्याने कार्यक्रमाला वैविध्यपूर्ण साहित्यिक रंगत लाभली.
मुरूम येथील निर्मलकुमार लिमये, आशिष वेदपाठक यांनीही याप्रसंगी आपल्या कविता सादर केल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. राम बजगिरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले यांनी तर आभार श्रीराम कुलकर्णी यांनी मानले. महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी तसेच साहित्यप्रेमी रसिकांची मोठी उपस्थिती होती. कवींच्या बहारदार सादरीकरणाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कवी संमेलन संस्मरणीय ठरले.

​

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india