धाराशिवच्या रस्त्यांची दुर्दशा : आमदारांच्या नाकर्तेपणावर राष्ट्रवादीचे ॲड विशाल साखरेंचा स्फोटक आरोप!
निविदा प्रलंबित,रस्ते विद्रूप… आमदार मात्र आरोपांच्या भोवऱ्यात!
धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव शहरातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था, तसेच तब्बल दोन वर्षांपासून १४० कोटींच्या निधीची निविदा प्रक्रिया रखडलेली असताना या संपूर्ण कारभाराची विशेष तपास पथकाकडून (SIT) चौकशी करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी धाराशिवचे आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी विधानसभेत केली. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात पुरवण्या मागण्यांवरील चर्चेदरम्यान त्यांनी धाराशिव मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
मात्र, धाराशिव शहरातील रस्त्यांचे प्रकरण मा.उच्च न्यायालय संभाजीनगर येथे प्रलंबित असताना, आमदार कैलास पाटील यांनी तेच प्रकरण विधिमंडळात उपस्थित करण्याची गरज आणि त्यामागील उद्देश काय, असा सवाल जिल्हा प्रवक्ते ॲड,विशाल साखरे यांनी उपस्थित केला जात आहे.
रस्त्यांच्या निविदा प्रक्रियेवरून सुरू असलेल्या राजकीय वादंगात,आमदार पाटील यांचे विधान हे कायद्याच्या कक्षेत येते का ?, याबाबतही विविध स्तरांतून चर्चेला उधाण आले आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना विधानमंडळात या विषयावर भाष्य करणे योग्य आहे का ?, असा प्रश्न ॲड,साखरे यांनी उपस्थित केला आहे.
धाराशिव शहरातील रस्त्यांच्या विकासाला राजकीय स्वार्थासाठी जाणीवपूर्वक खोडा घातला जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) जिल्हा प्रवक्ते ॲड, विशाल प्रभाकर साखरे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी सांगितले की, निविदा प्रक्रिया न्यायालयात प्रलंबित असताना रस्त्यांची दुरावस्था वाढतच गेली, मात्र आमदार निधी खर्च करून किमान तात्पुरती दुरुस्ती करण्याकडे आमदार पाटील यांनी कधीच लक्ष दिले नाही.
शहरातील रस्त्यांच्या बिकट अवस्थेमुळे नागरिकांचे हाल होत असताना, त्याची जबाबदारी जनतेने निवडून दिलेल्या आमदारांवरच येते, असा आरोप ही त्यांनी केला. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे झालेल्या अपघातात एका नागरिकाला जीवही गमवावा लागला, त्या प्रकरणाचे उत्तरदायित्वदेखील आमदार पाटील यांनी स्वीकारावे, अशी मागणी ॲड,साखरे यांनी केली.
“विधिमंडळात SIT चौकशीची मागणी करणे हा राजकीय दिखावा आहे. स्वतःकडे असलेला आमदार निधी शहराच्या विकासासाठी खर्च न करता, उलट न्यायालयीन प्रकरणाचे कारण पुढे करून रस्त्यांचा प्रश्न अधिकच बिघडविण्यात आला,” असा आरोपही त्यांनी केला.
धाराशिवच्या विकासाला खोडा घालण्याचा आमदार कैलास पाटील यांचा हा ‘राजकीय कट’ असल्याचा आरोप करीत ॲड,साखरे यांनी तातडीने रस्त्यांच्या कामासंदर्भातील प्रलंबित प्रक्रिया मार्गी लावून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी केली जात आहे.






