Best News Portal Development Company In India

चवदार तळ्याचा सत्याग्रह हा मानव मुक्तीसाठी होता.”* -प्रा डी डी मस्के !

*”चवदार तळ्याचा सत्याग्रह हा मानव मुक्तीसाठी होता.”*
-प्रा डी डी मस्के
——————————————————
नळदुर्ग (एस.के.गाकयवाड)
महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला हा सत्याग्रह केवळ पाणी पिण्यासाठी नसून तो समस्त मानव मुक्तीसाठी होता. असे विचार प्रा डी डी मस्के यांनी व्यक्त केले.
बार्शी जिल्हा सोलापूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह (नवे व जुने) आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वस्तीगृह यांनी आयोजित केलेल्या समता सप्ताहामध्ये, “चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि मानवी हक्क” या विषयावर प्रा डी डी मस्के बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक क्रांतीचे बंड किंवा मानवतेच्या क्रांतीचा झेंडा उभा करण्याचे निश्चित केले होते. कारण भेटीबंदी, लोटेबंदी, रोटी बंदी आणि बेटी बंदी अशा बंदी तोडण्यासाठी हा संकल्प डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मित्रमंडळीमध्ये जाहीर केला आणि या बंडाची सुरुवात कुठे आणि कशी करावी? हा प्रतिकाराचा लढा कुठून सुरू करावा? याबद्दल विचारविनिमय सुरू केला. प्रथम त्यांनी पंढरपूर या ठिकाणी हा प्रतिकाराचा लढा उभा करावा असा त्यांचा विचार होता. परंतु वारकरी संप्रदायाचे भक्ती पीठ असलेले पंढरपूर अवघा महाराष्ट्र विठ्ठल चरणी लिन होतो. इथेच पहिला हल्ला चढवला तर? परंतु चंद्रभागेचे वाळवंट हे रावबहादूर सि.के.बोले ठरावाच्या कक्षेत बसेल का? त्यासाठीची चढाई व लढाई टिकवता येईल का? कारण त्यात मारामाऱ्या, सरकार दरबार, कोर्ट,कचेऱ्या तुरुंगवास, दंड यात अमाप पैशाचा आणि वेळेचाही व्यय होईल असे त्यांना वाटले म्हणून त्यांनी पंढरपूरचा विचार सोडून दिला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हा लढा कोकणात करण्याचे निश्चित केले कारण कोकणी माणसे लढाईला फार आसुसलेली असतात. कोकणात पण कुठे? आणि कोणत्या जिल्ह्यात? हा झेंडा उभा करायचा हा विचार मांडताना डॉ.आंबेडकर म्हणाले की, मला रायगडच्या आसपासची जागा हवी. सहकाऱ्यानी विचारले
का?
डॉ.आंबेडकर म्हणाले कारण ६ जून १६७४ ला छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक रायगड या ठिकाणी झाला. शूद्र म्हणून शिवरायांचा अपमान केला गेला? गागाभट्टाने दक्षिणा घेऊन वेदोक्त पद्धतीने हा राज्याभिषेक केला.

निश्चलपुरी गोसावी हे छत्रपती शिवाजी महाराज यांना म्हणाले की,आपण शुद्र आहात तरीही क्षत्रियत्वाची जागा घेतली.तुम्ही भ्रष्टाचार केला.असे म्हणून तो रायगडावर ठाण मांडून बसला.त्यांनी एक भविष्यवाणी केली.१३ व्या दिवशी,२२ व्या दिवशी आणि ५५ व्या दिवशी अशुभ घटना घडतील.दूर्दैवाने निश्चलापूरी यांची ही भविष्यवाणी खरी ठरली.१३व्या दिवशी मातोश्री जिजाऊसाहेबांचे निधन झाले. २२ व्या दिवशी प्रतापगडावरील अश्व शाळेला आग लागून ती खाक झाली तर ५५ व्या दिवशी सिंहगडावरील महाराजांचा आवडता हत्ती मेला.
छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले काय केल्याने पापक्षालन होईल?
निश्चलपुरी म्हणाले राज्याभिषेक पुराणोक्त पद्धतीने केला पाहिजे.
हा प्रसंग सांगून डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की, मराठ्यांच्या छत्रपतींचे ब्राह्मणांनी इतकी दूर्दशा केली तरी मराठे मूग गिळून का बसले? कायस्थ गप्प का बसले? अहो ही सारी माणसे हिंदू धर्मातील विचारसरणीची गुलाम होऊन बसली होती. गुलामगिरी नष्ट करण्याचा प्रयत्न सत्यशोधक चळवळ करत होती पण ती तशीच आहे. अनंतराव, या गुलामगिरीला चांगला धक्का बसावा व तो अस्पृश्यांच्या क्रांतिकारक समतेच्या चळवळीतून बसावा अशी माझी इच्छा आहे. मग मराठी व इतर तत्सम जातीचे डोळे उघडतील. हे साधले तरी ही मंडळी अस्पृश्यांकडे आपुलकीने पाहावयास लागतील. तेव्हाच हिंदू समाजात सामाजिक समता प्रस्थापित करता येईल म्हणून रायगडाच्या आसपास आपल्या बंडाला क्षेत्र मिळाले पाहिजे.
अनंतराव चित्रे म्हणाले अशी जागा आमच्या महाडला आहे. महाड नगरपालिकेने १९२४ ला बोले ठरावाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. तिथे सुरबानाना टिपणीस हेच नगराध्यक्ष आहेत.
१९ आणि २० मार्च १९२७ ला महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह करण्याचे निश्चित करण्यात आले.
हा सगळा इतिहास सांगुन प्रा. डी.डी.मस्के पुढे म्हणाले की, मानवी हक्कांच्या साठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी साऊथ बरो कमिशन, सायमन कमिशन,गोलमेज परिषदा, समाज समता संघ, संयुक्त राष्ट्रांचा जाहिरनामा इ.बाबत चर्चा केली.
कमलाकर सारंगकर, रमेश गवळी सर यांचे ही समयोचित भाषण झाले.
यावेळी कमलाकर सारंगकर, सुभाष भोसले,व तिन्ही वसतीगृहातील कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india