महाडच्या सत्याग्रहाने रचला भारतीय सामाजिक क्रांतीचा पाया… प्रा. डॉ. महेश मोटे
मानवी हक्कांची सनद आणि आत्मसन्मानाचा लढा; आदर्श महाविद्यालयात व्याख्यान संपन्न
उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
महाडचा चवदार तळे सत्याग्रह ही केवळ पाणी पिण्यासाठी केलेली कृती नव्हती, तर ती हजारो वर्षांच्या गुलामगिरीविरुद्ध पुकारलेले बंड आणि मानवी हक्कांचा जाहीरनामा होता. या सत्याग्रहाने भारतीय सामाजिक क्रांतीचा पाया रचला असून, व्यक्तीच्या सन्मानाला सर्वोच्च स्थान दिले, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे यांनी केले.
उमरगा येथील आदर्श महाविद्यालयातील सांस्कृतिक सभागृहात मंगळवारी (ता. १४) सामाजिक समता सप्ताहानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. यंदा महाड सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी होत आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या वतीने ८ ते १४ एप्रिल दरम्यान आयोजित सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत ‘ महाडचा चवदार तळे सत्याग्रह आणि मानवी हक्कांची सनद ‘ या विषयावर हे व्याख्यान पार पडले. मानवी प्रतिष्ठेचे धर्मयुद्ध
आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात डॉ. मोटे पुढे म्हणाले की, २० मार्च १९२७ रोजी घडलेला हा लढा अस्तित्व आणि आत्मसन्मानाचा होता. सार्वजनिक मालमत्तेवर सर्वांचा समान अधिकार असतो, हे बाबासाहेबांनी कृतीतून सिद्ध केले. हा सत्याग्रह म्हणजे विषमतेच्या अंधाराविरुद्ध पुकारलेले अहिंसक धर्मयुद्ध होते. आज आपण जे मूलभूत अधिकार उपभोगत आहोत, त्यांची बीजे महाडच्या चिखलात पेरली गेली होती.
यावेळी त्यांनी बाबासाहेबांच्या ‘ शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ‘ या महामंत्राची ठिणगी महाडमधूनच पडल्याचे नमूद करत, ” माणूस आहोत आम्ही, माणूस म्हणून जगूयात,” असा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम सोलंकर होते. आपल्या अध्यक्षीय समारोपात त्यांनी सांगितले की, महाडच्या सत्याग्रहाचा खरा इतिहास प्रत्येकाला माहिती असणे गरजेचे असून, तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.
या वेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य राम माळगे, डॉ. बालाजी मोरे, डॉ. धनंजय मेनकुदळे, डॉ. सर्जेराव माळी,डॉ. आप्पाराव गायकवाड,
योगेश पांचाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून करण्यात आली.
प्रास्ताविक डॉ. बालाजी मोरे यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. सूत्रसंचालन प्रा. डॉ. बालाजी पिडगे तर आभार प्रा. डॉ. फुलचंद पवार यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. उमेश केशरे, प्रा. दत्ता सुर्यवंशी, डॉ. शिरीष रेड्डी, डॉ. अनिता सरपे, डॉ. संजय साळुंके आणि इतर प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या व्याख्यानास विद्यार्थी, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.





