Best News Portal Development Company In India

कंदर ता. करमाळा येथील प्राचीन महादेव मंदिर व श्रीराम मंदिरासाठी निधी उपलब्ध करावा अशी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे पत्रकार गणेश जगताप यांनी केली मागणी. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचे संबंधित अधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश !

कंदर ता. करमाळा येथील प्राचीन महादेव मंदिर व श्रीराम मंदिरासाठी निधी उपलब्ध करावा अशी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे पत्रकार गणेश जगताप यांनी केली मागणी.
राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचे संबंधित अधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
अविनाश जोशी/ करमाळा
कंदर (ता. करमाळा) जि. सोलापूर येथील प्राचीन महादेव मंदिर व श्रीराम मंदिरासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते गणेश जगताप यांनी केली आहे.त्यांच्या मागणीनुसार नाईक यांनी संबंधित अधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्याच्या निर्देश दिले आहेत.
दिलेल्या निवेदनानुसार करमाळा तालुक्यातील कंदर हे ऐतिहासिक गाव आहे.टेंभुर्णी-नगर मार्गावरील या गावात सुमारे ५०० वर्षांपूर्वीचे हेमाडपंथी शैलीतील भगवान महादेव मंदिर व प्रभू श्रीराम मंदिर असून ते धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.प्रत्येक श्रावण सोमवार, महाशिवरात्री, तसेच वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांप्रसंगी येथे हजारो भाविक गर्दी करतात. या मंदिरासमवेतच जोतिबा मंदिरही आहे, जे देखील भाविकांचे श्रद्धास्थान आहे.कंदर गावाची एक खास ऐतिहासिक आख्यायिका अशी आहे की श्रीरामांनी वनवास काळात येथे वास्तव्य केले होते आणि आजही येथे “सीतेची न्हाणी” म्हणून ओळखले जाणारे पुरातन स्थळ आहे. तसेच कण्वमुनी ऋषींचेही येथे वास्तव्य होते, असे सांगितले जाते. परंतु या सर्व धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांच्या आजूबाजूला कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत.
त्यामुळे या मंदिरांची डागडुजी व संरक्षक संरचना,बाग-बगिचा व सौंदर्याकरण व या परिसरात बोटिंग सुविधा तसेच भाविकांसाठी विश्रामगृह व सभागृह,घाट व पायऱ्या,स्वागत कक्ष व माहिती केंद्र
स्वच्छतागृहे व किचन शेड आदि कामे करण्यासाठी निधी मंजूर करावा अशी मागणी केली आहे.
कंदर हे गाव टेंभुर्णी-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग वरील असल्याने येथे आंध्रप्रदेश, तेलंगणा, केरळ आदी दक्षिणेकडील राज्यांमधून शिर्डीकडे जाणारे भाविक मोठ्या प्रमाणात ये-जा करत असतात. यामुळे या ठिकाणी पर्यटन वाढीस मोठा वाव असून, स्थानिकांना रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात.
त्यामुळे प्राचीन मंदिरांच्या विकासासाठी व भाविकांसाठी सुविधा निर्माण करण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत आवश्यक निधी मंजूर करावा अशी मागणी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे केली आहे.नाईक यांनी संबंधित अधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्याच्या निर्देश दिले आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india