Best News Portal Development Company In India

प्रोफेसर डॉ. सुधीर पंचगल्ले यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रेरणादायी प्रवास…

प्रोफेसर डॉ. सुधीर पंचगल्ले यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रेरणादायी प्रवास…

उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
निजाम राजवटीत तालुक्याचे मुख्यालय, कर्नाटक राज्याच्या सीमेवर असलेल्या आणि महाराष्ट्र राज्यातील शेवटचे टोक असलेल्या अतनूर या गावी प्रोफेसर डॉ. सुधीर पंचगल्ले यांचा जन्म मातोश्री सौ. कमलताई (गृहिणी) यांच्या पोटी दि.६ एप्रिल १९६६ झाला. अतनूर हे गाव निजाम काळात बिदर जिल्ह्यात होते. या गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे घाळप्पा स्वामी महाराज यांनी दीडशे वर्षापूर्वी जिवंत समाधी घेतल्याने या गावाला ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिक वारसा लाभला आहे. हे गाव चहूबाजूंनी बालाघाटच्या डोंगराच्या कुशीत तिरू नदीच्या काठावर वसलेले आहे. या पावन भूमीत सुधीर जन्मले. महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर हे गाव उस्मानाबाद आणि सध्याच्या धाराशिव जिल्ह्यात आहे. सन १९८२ ला लातूर जिल्ह्याची निर्मिती होऊन ते लातूर जिल्ह्यात आले. हे गाव सीमेवर वसलेले असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा नसतानाही सुधीर यांनी आपले शिक्षण पूर्ण करून वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी मिळविली. त्यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण विकास विद्यालयात झाले. पुढे त्यांनी उदगीर येथे वाणिज्य शाखेतून उच्च माध्यमिक व उदयगिरी महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. पदव्युत्तर शिक्षण हावगी स्वामी महाविद्यालयातून पूर्ण केले. यावेळी शिक्षण घेत असताना डॉ. नामदेव खंडेगावे सरांच्या सहवासात आल्याने त्यांचा सुधीरवर वैचारिक प्रभाव पडला. सर वर्गात म्हणायचे कांही बनायच असेलतर मन लावून अभ्यास करा, प्राध्यापक व्हा, निश्चित आपणास यश मिळेल. सुधीर यांना त्यांचे म्हणणे पटले. परंतु पुढे काय करायचे हे त्यांनाही माहित नव्हते. त्यांनी सरांची भेट घेऊन सरांना विचारले. सर मी पुढे काय करू ? तेव्हा सरांनी त्यांना एम. फील. करण्याचा सल्ला दिला. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात शिक्षण घेत असताना प्राचार्य डॉ. ना. य. डोळे यांच्या संपर्कात आल्याने वैचारिक बैठक पक्की झाली. प्रा. महादेव गंदीगुडे यांच्या मार्गदर्शनाने महाविद्यालयीन शिक्षणात येणाऱ्या अडचणी सहज सुटत गेल्या. त्यांच्या आजवरच्या प्रवासात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. राजाभाऊ गचके, प्रा. रमेश चणगे, प्रा. प्रल्हाद पदातुरे, प्रा. शिवाजीराव साळुंखे यांच्या मार्गदर्शन व सहवासामुळे महाविद्यालयीन शिक्षण व व्यक्तिगत जीवनात त्यांना मोलाचे सहकार्य लाभल्याने त्यामुळे पुढील शैक्षणिक प्रवास सुखकर होण्यास मोठी मदतच झाली.
त्यांनी अमरावती विद्यापीठातील शिवाजी महाविद्यालयामध्ये एम. फील. प्रवेश घेण्यासाठी गेले. तिथे माझी आणि सुधीर ची भेट झाली आणि एकाच रूममध्ये राहण्याचा योग आला. सुधीरचे वडील वैजिनाथराव हे जिल्हा परिषदेला शिक्षक असल्यामुळे त्यांची परिस्थिती चांगली होती. त्यांचे वडील म्हणजे नाटककार, वेशभूषाकार, पेन्टर, फोटोग्राफर, वक्ते, अंनिस चे कार्यकर्ते, एक उपक्रमशील आदर्श शिक्षक म्हणून त्यांच्या विचाराचा वसा आणि वारसा पुढे सुधीरने चालू ठेवला. दर महिन्याला त्याला मनी ऑर्डर यायची. मनी ऑर्डरचे पैसे घेतल्यानंतर एक पावती परत गावाकडे पोस्टमॅन स्वाक्षरी करून मागून घ्यायचा. त्यावर एक मेसेज लिहायची पद्धत होती. पोस्टमॅन आमच्या रूमवर आला की, आम्हाला वाटायचे सुधीरची मनी ऑर्डर आली. पोस्टमन पैसे काढून दिल्यानंतर त्यावर मेसेज सुधीर लिहायचा. मी त्याला म्हणायचं बाबा आपण पाठविलेले पैसे मला मिळाले. मी सुखरूप आहे. २५ तारखेपर्यंत अजून चारशे रुपये पाठवा. सुधीर हे अगदी हळव्या स्वभावाचा असल्यामुळे तो आमचा ऐकायचा आणि लागलीच तसेच लिहायचा. वर्षभर नियमित राहून आम्ही एम. फील. चा संशोधन प्रबंध सादर केला. पहिल्याच प्रयत्नात आम्ही दोघेही एम. फील. उत्तीर्ण झालो.
सुधीर यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अध्यापनातून विद्यार्थ्यांना फक्त विषयाचे ज्ञान दिले नाही तर जीवन मूल्यांचेही बाळकडू दिले. वर्गात शिकवताना त्यांचा अभ्यासपूर्ण दृष्टिकोन विद्यार्थ्यांशी नाते, जिव्हाळा आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी तळमळ ही विशेष राहिली. त्यांचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात नावलौकिकास पात्र ठरले आहेत.
सुधीर यांनी ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रात जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे व निष्ठेने पार पाडली. त्यामुळे विद्यार्थी, सहकारी आणि पालक यांच्या मनात त्यांच्याविषयी विशेष आदर आणि आत्मीयता राहिली. आजपर्यंत त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून जे संस्कार रुजवले ते पुढील पिढ्यांना दिशादर्शक व प्रेरणा देणारे राहतील.
सुधीर यांनी आपल्या सेवा काळात प्रा. डॉ. शिवकुमार गिराम यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०१६ मध्ये ” परफॉर्मन्स इ व्हॅल्युशन ऑफ मार्केट कमिटी इन उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट ” या विषयावर पीएच. डी. पदवी प्राप्त केली. त्यानंतर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या पीएच. डी. संशोधन मार्गदर्शक, कुलगुरूंचे प्रतिनिधी, प्राध्यापक पदोन्नती निवड समितीचे विषयतज्ञ, शैक्षणिक व प्रशासकीय अंकेक्षण (AAA), महाविद्यालयीन संलग्नीकरण समितीचे सदस्य म्हणूनही उत्तम कार्य केले. संशोधनाच्या क्षेत्रात देखील देश-विदेश पातळीवर नामांकित संशोधन पत्रिकेत त्यांचे लेख प्रकाशित झाले आहेत. महाविद्यालयात देखील त्यांनी यु.जी.सी., नॅक, आय.क्यु.ए.सी., अकॅडमी ऑडिट या कामी त्यांचे योगदान राहिले आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य अधिवेशन, परिषद, चर्चासत्र व कार्यशाळेत सक्रिय सहभागी होऊन प्रतिनिधित्व केले. काही राष्ट्रीय, राज्य परिषद व कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन केले. रोटरी इंटरनॅशनल, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र पत्रकार संघ या सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी म्हणूनही कार्यरत आहेत. शैक्षणिक व महाविद्यालयीन काम हेच आपले कर्तव्य समजून त्यांनी प्रत्येक जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली. अनेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांनी समाजात माणुसकीचे मूल्य रुजविले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर च्या शेवटचे टोक असलेल्या मुरूम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात विनाअनुदानित तत्वावर १ सप्टेंबर १९९४ ला प्राध्यापक म्हणून रुजू होऊन अध्यापकाच्या भूमिकेतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली. विद्यार्थ्यांच्या बुद्धीला ज्ञानाची धार आणि मनाला संस्काराची उपक्रमशीलता देत शिक्षणाला केवळ अभ्यास न ठेवता जीवनाचा व्यापक अर्थ प्राप्त करून दिला. माधवराव पाटील महाविद्यालयात आपल्या सेवेच्या काळात त्यांनी फक्त प्राध्यापक ही सेवा बजावली नाही तर त्याबरोबर ते त्यांच्या अंगी असलेल्या विविध गुणातून स्क्रीन प्रिंटिंग, फोटोग्राफी या कलेत ते पारंगत राहिले. सुधीर यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा या परिसरात अखंडपणे तेवत ठेवला. त्यांच्या अंगी नाही हा शब्द कधीही नव्हता. महाविद्यालयीन पातळीवर त्यांनी वेळोवेळी विविध प्रकारची कामे केली. त्यांनी वृत्तपत्रांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. या माध्यमातून त्यांनी त्यांच्या परिसरातील विविध विषयांना न्याय दिला. तसेच विविध सामाजिक विषयावर लेख लिहून प्रकाशित केले. त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ६६ च्यावर शोधनिबंध नामांकित जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. ते वाणिज्य विषयाच्या आय. सी. ए. चे आजीवन सदस्य. त्यांच्या विषयाच्या राष्ट्रीय परिषदेमध्ये औरंगाबाद, हैदराबाद, जयपूर, उदयपूर आदी ठिकाणी जाऊन शोधनिबंधाचे सादरीकरण केले. विविध महाविद्यालयात साधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन केले आहे. त्यांचा महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यात देखील मोठा शैक्षणिक संपर्क, मित्रपरिवार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगरच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अभ्यास मंडळावर सदस्य, एनईपी-२०२० अभ्यासक्रमात, यापूर्वीही त्यांनी विद्यापीठाच्या वाणिज्य विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. वाणिज्य विद्याशाखेत संगणक या विषयाचे ज्ञान अवगत व्हावे म्हणून सन २००२-०३ च्या काळात तत्कालीन अधिष्ठात्यांना वाणिज्य शाखेत बदलत्या काळानुरूप तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल संगणक हा विषय किती महत्त्वाचा आहे, हे पटवून देऊन अभ्यासक्रमात तीनही वर्षाला बेसिक कॉम्प्युटर, वर्ड एक्सेल, टॅली कॉम्प्युटराईजड, अकाउंटिंग, ई- कॉमर्स आदी विषय सर्वप्रथम विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात प्रोफेसर डॉ. सुधीर पंचगल्ले यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.
सुधीर आज ३१ वर्षे वाणिज्य विषयाची सेवा बजावून दि. ३० एप्रिल २०२६ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असून हा त्यांचा शेवट नसून आयुष्यभर ज्ञानदीप प्रज्वलित ठेवणाऱ्या तेजस्वी प्रवासाचा एक शांत समाधानकारक आणि सुवर्णमयी विराम असतो. सर निवृत्त होत असले तरी तुमच्या विचारांची, संस्काराची आणि प्रेरणेची किरणे अनंत काळ विद्यार्थ्यांच्या जीवनात उजळत राहतील, यात शंकाच नाही.
त्यांच्या या जीवन प्रवासात त्यांच्या पत्नी सौ. विजया बेलकेरी या मुरूम येथील स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालयातून जीवशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका म्हणून एक वर्षापूर्वीच सेवानिवृत्त झाल्या. त्यांचे चिरंजीव अनिकेत एमबीबीएस शिक्षण पूर्ण करून वैद्यकीय क्षेत्रात योगदान देत आहेत.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन नगर शिक्षण विकास मंडळ, मुरूम संस्थेने आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार-२०२५, नॅशनल एक्सलन्स अचीव्हर्स अवार्ड-२०२५, राजश्री शाहू महाराज आंतरराष्ट्रीय सन्मान पुरस्कार-२०१९ आणि त्यांना नुकताच शिर्डी येथे १ फेब्रुवारी २०२६ रोजी बी. दि. चेंज फाउंडेशन तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला.
एक कर्तव्यदक्ष प्राध्यापक, मार्गदर्शक आणि आदर्श व्यक्तिमत्व महाविद्यालयातून सेवानिवृत्त होत आहे. सेवानिवृत्ती ही शेवट नसून एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे. प्रोफेसर डॉ. सुधीर पंचगल्ले यांचे कार्य, त्यांची निष्ठा आणि त्यांचे आदर्श पुढील पिढीसाठी दीपस्तंभासारखे ठरतील. त्यांनी निर्माण केलेला आदर्श कायम प्रेरणा देत राहील. पुढील काळासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभो ! याच त्यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !

प्रा. डॉ. मारोती कच्छवे वाणिज्य विभाग प्रमुख व संशोधन मार्गदर्शक
कै. रमेश वरपूडकर महाविद्यालय,
सोनपेठ, जि. परभणी

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india