धक्कादायक: मुरुम परिसरात अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून अत्याचार; ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !
तुळजापूर प्रतिनिधी:-धाराशिव जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण व संतापाची लाट
तालुक्यातील एका गावातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका १७ वर्षे ८ महिने वय असलेल्या अल्पवयीन मुलीचा बळजबरीने बालविवाह लावून देऊन, तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात ७ जणांविरुद्ध पोक्सो आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मुरूम पोलीस करत आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ७ मार्च २०२५ ते २७ एप्रिल २०२६ या कालावधीत ही घटना घडली. आरोपींनी संगनमत करून पीडित मुलीचा विवाह एका तरुणासोबत लावून दिला. या काळात पीडितेच्या संमतीविना संबंधित तरुणाने तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले.
पीडितेने या त्रासाला कंटाळून अखेर २९ एप्रिल २०२६ रोजी पोलीस ठाण्यात धाव घेत आपली फिर्याद नोंदवली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गुन्हा नोंदवला आहे. पण तपासाला गती देण्याची मागणी होतेय.
पोलिसांनी या प्रकरणात मुख्य आरोपी तरुणासह लग्नासाठी प्रोत्साहन देणाऱ्या इतर सहकाऱ्यांवर खालील कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे:
भारतीय न्याय संहिता (BNS): कलम ६४(१), ६४(२)(एम) (बलात्कार), १३७(२), १२७(३), ७८, ११५, ३५१(२).
पोक्सो ॲक्ट (POCSO): कलम ४, ६, ८, १२ (अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार).
मुरुम पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तपास यंत्रणा वेगाने हलवली आहे. बालविवाह प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन आणि अल्पवयीन मुलीवरील अत्याचार या दोन्ही बाजूने पोलीस सखोल तपास करत आहेत. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
सावधान: बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे. आपल्या परिसरात असा प्रकार घडत असल्यास त्वरित पोलीस किंवा ‘१०९८’ या चाईल्ड हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा. नागरिकांनी सतर्क आणि सजग राहण्याची गरज आहे.






