उमरगा बसस्थानकावरील गर्दीचा फायदा घेत व्यापाऱ्याचे सव्वा दोन लाख लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल!
तुळजापूर (प्रतिनिधी):-भुरट्या चोरांनी आपला मोर्चा बसस्थानकावरती वळवलेला दिसतोय कारण जिल्ह्यातील 25% चोऱ्या या बसस्थानकावरती होत आहेत. पोलिसांपेक्षा हायटेक झालेत असं म्हणायचंय का? प्रत्येक बस स्थानकावर ती पोलीस बंदोबस्त हा असतोच तरी चोर इतके बिनधास्त कसे
उमरगा शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढत असतानाच, बसस्थानकावरील गर्दीचा फायदा घेत एका व्यापाऱ्याची पैशांची बॅग कापून तब्बल २ लाख ३५ हजार रुपये चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महताब उस्मान शेख (वय ३५ वर्षे, रा. सुगाव, ता. चाकूर, जि. लातूर) हे लातूर येथील ‘अशोका इंटरप्रायजेस’ या कंपनीत काम करतात. शुक्रवारी, दि. ०८ मे २०२६ रोजी ते कंपनीच्या वसुलीसाठी उमरगा शहरात आले होते. उमरगा येथील १५ ते २० किराणा दुकान दारांकडून शेंगदाणा विक्रीचे एकूण ३,००,००० रुपये जमा करून त्यांनी ते आपल्या काखेतील बॅगेत ठेवले होते. संध्याकाळी ५:१५ वाजेच्या सुमारास लातूरला जाण्यासाठी ते उमरगा बसस्थानकावर आले. बसमध्ये चढत असताना प्रवाशांच्या प्रचंड गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात चोरट्याने कटरच्या साहाय्याने त्यांची बॅग कापली. गर्दीच्या गोंधळात महताब शेख यांना काही समजण्याच्या आतच चोरट्याने बॅगेतील २,३५,००० रुपयांची रोकड लंपास केली.
बॅग कापल्याचे लक्षात येताच शेख यांनी तात्काळ उमरगा पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून उमरगा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आता बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासून चोरट्याचा माग काढत आहेत. पुढील तपास चालू आहे.
बसस्थानक किंवा सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंची आणि रोख रकमेची काळजी घ्यावी, तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. महाराष्ट्र परिवहन मंडळाने या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यासाठी योग्य पावले उचलावीत अशी इच्छा सर्वसामान्य प्रवासी व नागरिकांतून व्यक्त होत आहे.






