Best News Portal Development Company In India

संवादातून समन्वयाकडे : आमदार प्रवीण स्वामी अँड. शीतल चव्हाण यांच्यात सविस्तर चर्चा; मतदारसंघातील प्रश्नांवर समन्वयाने काम करण्याचे संकेत!

*संवादातून समन्वयाकडे : आमदार प्रवीण स्वामी अँड. शीतल चव्हाण यांच्यात सविस्तर चर्चा; मतदारसंघातील प्रश्नांवर समन्वयाने काम करण्याचे संकेत*

उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
उमरगा–लोहारा विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्न, नागरिकांच्या अपेक्षा, कार्यकर्त्यांमधील संभ्रम, महाविकास आघाडीतील समन्वय आणि मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने अधिक व्यापक संवादाची आवश्यकता या पार्श्वभूमीवर मा. आमदार प्रवीण स्वामी आणि सामाजिक कार्यकर्ते तथा लेखक अँड. शीतल शामराव चव्हाण यांच्यात काल आमदारांच्या कार्यालयात सविस्तर चर्चा पार पडली.

काही दिवसांपूर्वी अँड. शीतल चव्हाण यांनी सोशल मीडियाद्वारे आपली भूमिका मांडताना मतदारसंघातील निर्णय प्रक्रियेत अधिक संवाद, समन्वय आणि सहभाग असावा, अशी स्पष्ट अपेक्षा व्यक्त केली होती. निवडणुकीपासून आजपर्यंत अनेक कार्यकर्ते, समविचारी व्यक्ती, सामाजिक संघटना आणि विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या लोकांनी मतदारसंघातील परिवर्तनाच्या अपेक्षेने साथ दिली; मात्र त्या उर्जेला आणि विश्वासाला संघटित स्वरूपात दिशा देण्यासाठी अधिक सुसंवाद आणि सहभागाची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले होते.

या भूमिकेची दखल घेत मा. आमदार प्रवीण स्वामी यांनी स्वतः पुढाकार घेत अँड. शीतल चव्हाण यांना चर्चेसाठी निमंत्रित केले. काल झालेल्या बैठकीत राज्यातील बदलते राजकारण, महाविकास आघाडीसमोरील आव्हाने, स्थानिक पातळीवरील विकासकामे, प्रशासनाशी समन्वय, मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न, पक्ष संघटन विस्तार, सामाजिक वाचन चळवळींची भूमिका, विविध घटकांना विश्वासात घेऊन निर्णय प्रक्रिया राबवण्याची गरज अशा अनेक विषयांवर सखोल चर्चा झाली.

चर्चेदरम्यान अँड. शीतल चव्हाण यांनी उमरगा–लोहारा मतदारसंघात गेल्या काही वर्षांत निर्माण झालेल्या सामाजिक आणि राजकीय उर्जेचा उल्लेख करताना सांगितले की, हा मतदारसंघ केवळ निवडणुकीपुरता मर्यादित राहू नये. येथे सर्वसामान्य कार्यकर्ते, अभ्यासू तरुण, सामाजिक चळवळी, वाचन संस्कृती आणि परिवर्तनवादी विचारसरणी यांना जोडून एक व्यापक लोकसहभाग निर्माण होणे आवश्यक आहे. जनतेला केवळ आश्वासने नकोत, तर सतत संवाद साधणारी आणि लोकांना विश्वासात घेणारी लोकप्रतिनिधी व्यवस्था अपेक्षित आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सूत्रांच्या माहितीनुसार, चर्चेदरम्यान अनेक स्थानिक प्रश्नांवरही सविस्तर चर्चा झाली. नागरिकांच्या अडचणी वेळेत प्रशासनापर्यंत पोहोचणे, विविध विभागांशी समन्वय वाढवणे, स्थानिक स्तरावरील असंतोष किंवा संभ्रम थेट संवादातून दूर करणे, तसेच मतदारसंघातील विविध समविचारी घटकांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने पुढील काळात अधिक सक्रिय यंत्रणा उभी करण्याबाबतही चर्चा झाल्याचे समजते.

आमदार प्रवीण स्वामी यांनी चर्चेदरम्यान मांडण्यात आलेल्या अनेक मुद्द्यांची गांभीर्याने नोंद घेतली असून पुढील काळात अधिक समन्वय, संवाद आणि प्रत्यक्ष हस्तक्षेप वाढवण्याबाबत सकारात्मकता दर्शवली.

मतदारसंघातील विकासकामे, प्रशासनिक पाठपुरावा आणि लोकसहभाग अधिक प्रभावी करण्यासाठी रचनात्मक सहकार्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी मान्य केल्याचे सांगितले जाते.

बैठकीनंतर ऍड. शीतल चव्हाण यांनी मतदारसंघातील नागरिक, कार्यकर्ते, समविचारी व्यक्ती, सामाजिक संघटना आणि विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या लोकांना आवाहन केले आहे की, मतदारसंघाशी संबंधित कुठल्याही समस्या, सूचना, तक्रारी किंवा महत्त्वाचे विषय असतील तर ते थेट त्यांच्यापर्यंत अथवा आमदार प्रवीण स्वामी यांच्यापर्यंत पोहोचवावेत. लोकांच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा, आवश्यक त्या विषयांवर भूमिका आणि रचनात्मक दबाव निर्माण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“लोकशाही ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसते. निवडून आलेल्या प्रतिनिधींशी सतत संवाद, प्रश्नांवर सार्वजनिक चर्चा, विधायक सूचना आणि सामूहिक सहभाग यांतूनच लोकशाही अधिक मजबूत होत असते. मतभेद असू शकतात; पण संवाद तुटता कामा नये. कारण शेवटी प्रश्न व्यक्तींचा नसून मतदारसंघाच्या भविष्याचा आहे,” अशी भूमिका अँड. शीतल चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली.

उमरगा–लोहारा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आणि त्यातून पुढे आलेले समन्वयाचे संकेत राजकीय व सामाजिक वर्तुळात महत्त्वाचे मानले जात आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india