Best News Portal Development Company In India

वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची राष्ट्रवादीची मागणी!

वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची राष्ट्रवादीची मागणी
– – – – – – – – – –
मा.मुख्यमंत्री ,जिल्हाधिकारी यांना तहसीलदारा मार्फत दिले निवेदन.
– – – – – – – –
उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
उमरगा तालुक्यात दि .२१ रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी मोठ्या पावसामुळे काळ लिंबाळा, कोराळ, कलदेव लिंबाळा, दाळिंब व नळवाडी आणि तालुक्यातील इतर परिसरात घरांचे ,विद्युत पोल तारा ,फळझाडे , जनावरे यांचे मोठे नुकसान झाले आहे .शेतकऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी उमरगा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष बाबा जाफरी ,रमेश बिराजदार , भीमा स्वामी, शमशोद्दीन जमादार ,सुभाष गायकवाड , नेताजी कवठे यांनी नुकसान झालेल्या गावांची पाहणी करून मुख्यमंत्री तथा जिल्हाधिकारी यांना तहसीलदार यांच्यामार्फत दि.२२ रोजी निवेदन दिले आहे .
देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की ,उमरगा तालुक्यात दिनांक २१ रोजी काळ लिंबाळा, कोराळ, कलदेव लिंबाळा, डाळिंब व नळवाडी आणि तालुक्यातील इतर परिसरात अचानक जोराचे वादळी वारे व मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस झाला. या नैसर्गिक आपत्तीमुळे परिसरातील मोठेमोठी झाडे उन्मळून पडल्याने अनेक घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच बहुतांश घरांवरील पत्रे उडून गेली आहेत. वादळामुळे ठिकठिकाणी विद्युत पोल कोसळल्याने संपूर्ण विद्युत पुरवठा खंडित झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. गावांना जोडणाऱ्या मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर झाडे पडल्यामुळे वाहतूक व दळणवळणाचे रस्ते पूर्णपणे बंद झाले आहेत. यासोबतच, शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले असून प्रामुख्याने आंब्याच्या बागा, पपई व इतर पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. शेतातील जनावरांच्या चाऱ्याच्या कडब्याच्या बनीमी, शेतकऱ्यांचे शेड यांचेही मोठे नुकसान झाले असून, यामध्ये काही जनावरे गंभीर जखमी झाली आहेत. या अचानक आलेल्या संकटामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकरी वर्गाचे अतोनात आर्थिक नुकसान झाले असून ते पूर्णपणे अडचणीत सापडले आहेत. तरी प्रशासनाने या गंभीर परिस्थितीची त्वरित दखल घेऊन, झालेल्या सर्व नुकसानीचे शासकीय स्तरावर त्वरित व वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत आणि बाधित ग्रामस्थ व शेतकऱ्यांना शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक नुकसान भरपाई लवकरात लवकर मंजूर करावे असे निवेदनात म्हटले आहे . यावेळी अशोक जाधव ,मनोज देशपांडे व्यंकट बिराजदार ,आनंद नागणे ,फैयाज पठाण ,कलेश्वर जाधव ,रमेश राठोड आदी सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india