Best News Portal Development Company In India

धाराशिव : विकासपुरुषांची जागतिक राजधानी!* उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

*धाराशिव : विकासपुरुषांची जागतिक राजधानी!*
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
धाराशिव जिल्ह्यातील जनतेने आता कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही. कारण आपल्या जिल्ह्याला विकासासाठी पक्ष बदलणाऱ्या नेत्यांची अक्षरशः खाण लाभलेली आहे.

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी विकासाचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून, एक रुपया किंवा एक खोका न घेता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला आहे. माजी मंत्री बसवराज पाटील यांनीही तीन वर्षांपूर्वी विकासासाठी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी मतदारांना पैसे न देता, एक रुपयाही खर्च न करता, प्रचंड मतांनी विधान परिषद निवडणूक जिंकली.

यापूर्वीही विकासाचा हाच पवित्र मार्ग स्वीकारत राणा पाटील राष्ट्रवादीतून भाजपात, तानाजी सावंत शिवसेना-शिंदे गटात, ज्ञानराज चौगुले शिंदे गटात, तर माजी खासदार रवींद्र गायकवाड शिवसेना (उबाठा) मधून शिंदे गटात गेले.

या सर्व नेत्यांचा त्याग, निष्ठा, विचारधारा आणि विकासनिष्ठ पक्षांतरांचा इतिहास पाहता धाराशिवच्या विकासाबाबत आता कोणतीही शंका उरत नाही.

रस्ते, पाणी, उद्योग, रोजगार, आरोग्य, शिक्षण, शेती, गुंतवणूक, क्रीडा, पर्यटन यांसारख्या क्षुल्लक गोष्टींवर चर्चा करण्यात वेळ घालवू नये. कारण विकास हा पक्षांतरातूनच होतो, हे आपल्या नेत्यांनी वारंवार सिद्ध केले आहे. त्यामुळे धाराशिवकरांनी आता निश्चिंत राहावे. एवढे विकासपुरुष एकाच जिल्ह्यात असताना धाराशिव लवकरच महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे, तर जगातील सर्वाधिक विकसित जिल्हा म्हणून ओळखला जाईल.

फक्त एकच चिंता आहे. इतका विकास एकाच जिल्ह्यात झाला तर संयुक्त राष्ट्र संघाला “विकसित प्रदेश” ही संकल्पना नव्याने लिहावी लागेल!

© ऍड. शीतल शामराव चव्हाण
(मो. 9921657346)

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india