धाराशिव जिल्ह्यात खरीप पिकांच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ पाहणी सुरु; आठवडाभरात जिल्हास्तरीय अहवाल सादर होणार!
तुळजापूर प्रतिनिधी:- आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सूचनेची प्रशासनाकडून दखल. ‘पीक कापणी प्रयोगा’साठीच्या प्लॉटची माहिती घेऊनच काढणी करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन.
पावसाच्या मोठ्या खंडामुळे धाराशिव जिल्ह्यातील खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, पिकांच्या नुकसानीची शास्त्रीय व वस्तुनिष्ठ पाहणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलेल्या सूचनेची तातडीने दखल घेत, जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल यंत्रणेला प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील आठवडाभरात हा जिल्हास्तरीय अहवाल तयार होण्याची शक्यता आहे.
पावसातील खंडामुळे पिकांची झालेली दुरवस्था, नुकसानीची तीव्रता आणि संभाव्य उत्पादन घट याची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. या अहवालात ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान आढळल्यास, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) निकषांनुसार बाधित शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आवाहन- पीक कापणी प्रयोगापूर्वी पिके काढू नका.
पीक विमा आणि शासकीय मदतीच्या दृष्टीने ‘पीक कापणी प्रयोग’ अत्यंत महत्त्वाचा असतो. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक महसूल मंडळात प्रत्येक पिकासाठी १२ विशिष्ट प्लॉट निश्चित करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शेतकऱ्यांना खालील काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
’निरंक’ नोंदीचा धोका- जर निश्चित केलेल्या प्लॉटवरील पिकाची काढणी प्रयोगापूर्वीच केली, तर तेथे ‘निरंक’ नोंद होऊ शकते. यामुळे प्रत्यक्ष नुकसान होऊनही तांत्रिक अडचणींमुळे भरपाई मिळण्यात अडथळे येऊ शकतात.
कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधा- पिकांची काढणी करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपापल्या गावातील किंवा मंडळातील कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून निश्चित केलेल्या प्लॉटची खात्री करून घ्यावी.
”जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वेळेत आणि योग्य भरपाई मिळावी यासाठी आपला सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. प्रशासनाचा वस्तुनिष्ठ अहवाल लवकरात लवकर शासनाकडे सादर केला जाईल.”
— आमदार राणाजगजितसिंह पाटील.






