मराठा आरक्षणासाठी तुळजापुरात ‘बोंब मारो’ आंदोलन; जरांगे पाटलांच्या प्रकृतीवरून सरकारला तीव्र आंदोलनाचा इशारा
तुळजापूर प्रतिनिधी:-
मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे २९ ऑगस्टपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असल्याने, तुळजापुरात मराठा समाज आक्रमक झाला आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशीही सरकारने योग्य ती दखल न घेतल्याचा आरोप करत मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि सकल मराठा समाज, तुळजापूर यांच्या वतीने बुधवारी (दि. २) तहसील कार्यालयासमोर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत ‘बोंब मारो’ आंदोलन छेडण्यात आले.
या आंदोलनादरम्यान संतप्त आंदोलकांनी राज्य सरकारमधील विविध मंत्र्यांच्या विरोधात जाहीर घोषणा देऊन त्यांच्या नावाने बोंब मारली.
‘सरकारने तत्काळ मार्ग काढून उपोषण सोडवावे’
आंदोलनानंतर तुळजापूरच्या तहसीलदारांना एक निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केले आहे की, जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस असून त्यांची प्रकृती बिघडत चालली आहे. तरीही सरकारकडून या संवेदनशील विषयाची गांभीर्याने दखल घेतली जात नाही. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजात प्रचंड संताप आणि रोष निर्माण होत आहे. सरकारने मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर तातडीने ठोस पावले उचलून जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सोडवावे, अशी जोरदार मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
महाराष्ट्राला हादरवणारे आंदोलन छेडण्याचा इशारा
यावेळी बोलताना आंदोलक प्रतिनिधींनी सरकारला तीव्र इशारा दिला. “हे तर फक्त आंदोलन आणि निषेधाची सुरुवात आहे. यापुढे जर सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांकडे आणि जरांगे पाटलांच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केले, तर संपूर्ण महाराष्ट्र शासनाला हादरवून सोडणारे तीव्र आंदोलन छेडले जाईल. त्यातून उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीची आणि परिणामांची जबाबदारी सर्वस्वी सरकारची राहील,” असा कडक इशारा मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला.
या आंदोलनात सकल मराठा समाजातील तसेच मराठा क्रांती ठोक मोर्चाचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.





