मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी तीर्थ बुद्रुक येथे तहसीलदार साहेबांना निवेदन!
– ५८ लाख नोंदींच्या आधारे प्रमाणपत्रे, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची आणि ५०% मर्यादेतील टिकाऊ आरक्षणाची जोरदार मागणी
तुळजापूर (प्रतिनिधी):
तुळजापूर तालुक्यातील तीर्थ बुद्रुक येथील मराठा समाज बांधवांच्या वतीने मराठा समाजाच्या विविध रास्त व न्याय्य मागण्यांसाठी मा. तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय तुळजापूर (जि. धाराशिव) यांना गुरुवारी एक मुखी निवेदन देण्यात आले.
“एकी हीच शक्ती… संघटन हेच सामर्थ्य…!” या ब्रीदवाक्याला जागून तीर्थ बुद्रुक येथील समस्त मराठा समाज बांधवांनी एकत्र येत प्रशासनाचे लक्ष वेधले. मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक हितासाठी शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदनातील प्रमुख मागण्या:
कुणबी प्रमाणपत्रे मिळणे: मराठा-कुणबी ५८ लाख नोंदींच्या आधारे पात्र लाभार्थ्यांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्रे देण्यात यावीत.
हैदराबाद गॅझेटनुसार प्रक्रिया: हैदराबाद गॅझेटनुसार पात्र मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया तात्काळ व सुलभ करण्यात यावी.
गुन्हे मागे घेणे: मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान मराठा समाजातील बांधवांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत किंवा रद्द करण्यात यावेत.
घटनात्मक आरक्षण: मराठा समाजाला भारतीय संविधानाच्या चौकटीत व ५०% आरक्षणाच्या मर्यादेच्या आतील टिकणारे आरक्षण तात्काळ देण्यात यावे.
जी.आर.ची अमलबजावणी: सातारा, कोल्हापूर, औंध संस्थानांचे गॅझेट इयर बॉम्बे गॅझेटचा तात्काळ जी.आर. काढून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी.
कुटुंबांचे पुनर्वसन: मराठा आरक्षण लढ्यात आत्महत्या केलेल्या बांधवांच्या कुटुंबातील सदस्यांना तात्काळ सरकारी नोकरी देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे.
तसेच या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, या सर्व मागण्या मराठा समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तरी तहसीलदारांनी या निवेदनाची गंभीर दखल घेऊन या मागण्या शासनाच्या संबंधित विभागाकडे तात्काळ पाठवाव्यात व योग्य ती सकारात्मक कार्यवाही करण्याची शिफारस करावी, अशी आग्रही मागणी समस्त मराठा समाज, तीर्थ बुद्रुक यांच्या वतीने करण्यात आली आहे.






