खासदार ओमराजे निंबाळकर थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; तुळजापूर व लोहारा तालुक्यातील वाळलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करून तातडीने पंचनाम्याचे प्रशासनाला निर्देश!
तुळजापूर प्रतिनिधी:-
मराठवाड्यात मागील तब्बल दीड महिन्यापासून पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या भीषण दुष्काळसदृश परिस्थितीचा फटका सोयाबीन पिकाला बसला आहे. पाण्याअभावी हाताशी आलेली पिके डोळ्यांदेखत करपून वाळून जात असल्याने बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत प्रशासनाला तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.
पाहणी करण्यात आलेली गावे
तुळजापूर तालुका: सलगरा दिवटी, गंधोरा
लोहारा तालुका: हिप्परगा रवा, माळेगाव, वडगाव गांजा, विलासपूर पांढरी
शासकीय मदतीसाठी प्रशासनाला निर्देश
पाहणी दरम्यान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. पावसाच्या प्रदीर्घ खंडांमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले असून बळीराजा पूर्णपणे हवालदिल झाला आहे. पिकांची दयनीय अवस्था पाहून खासदारांनी घटनास्थळावरूनच प्रशासनाला तातडीने वस्तुनिष्ठ पंचनामे पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
”शेतकरी आज मोठ्या संकटात आहे. करपलेल्या पिकांचे पंचनामे तातडीने पूर्ण करून नियमानुसार जास्तीत जास्त शासकीय मदत मिळवून देण्यासाठी मी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करेन. या कठीण काळात शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.” — खासदार ओमराजे निंबाळकर
शेतकऱ्यांना पीक विमा आणि शासकीय मदत लवकरात लवकर मिळावी यासाठी कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी यावेळी दिला.
या पाहणी दरम्यान , शासकीय अधिकारी, शिवसेनेचे युवा नेतृत्व प्रतिक रोचकरी, शेतकरी, महिला, शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.







