Best News Portal Development Company In India

तुळजापूरात २४ व २५ फेब्रुवारीला जिल्हास्तरीय शेतकरी कृषी महोत्सव;आधुनिक तंत्रज्ञान प्रदर्शन व शेती उपयोगी साहित्याची विक्री!

तुळजापूरात २४ व २५ फेब्रुवारीला जिल्हास्तरीय शेतकरी कृषी महोत्सव;आधुनिक तंत्रज्ञान प्रदर्शन व शेती उपयोगी साहित्याची विक्री!

तुळजापूर : शेतकऱ्यांची प्रगती, शेतीमालाला योग्य बाजारभाव आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार व्हावा या उद्देशाने २४ व २५ फेब्रुवारी २०२६ रोजी तुळजापूर येथे जिल्हास्तरीय कृषी महोत्सव-२०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. सैनिक विद्यालय मैदान, नळदुर्ग रोड तुळजापूर येथे होणाऱ्या या महोत्सवात शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशा विविध उपक्रमांची रेलचेल व आधुनिक तंत्रज्ञान असलेली अवजारे पाहता व विकत घेता येणार आहेत .
महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री .किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी स्वतः आरोग्य तपासणी (हेल्थ चेक) करून कृषी प्रदर्शनास सुरुवात केली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करत विविध स्टॉल्सना भेट देऊन उपस्थित शेतकरी व अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी तालुकाकृषी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.महोत्सवात एकूण ७० दालनांची उभारणी करण्यात आली असून त्यापैकी ३० शासकीय दालनांमधून कृषी, महसूल, पशुसंवर्धन, जलसंधारण तसेच महिला व बालकल्याण विभागांच्या योजनांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय ड्रोन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि कृषी यांत्रिकीकरण यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर विशेष भर देण्यात आला आहे.
सोयाबीन, हरभरा, ऊस, रेशीम आणि आंबा यांसारख्या पिकांच्या लागवडीपासून ते प्रक्रिया व निर्यातीपर्यंत तज्ज्ञांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळणार आहे.उत्पादक ते ग्राहक या संकल्पनेतून थेट विक्री दालनांद्वारे शेतकऱ्यांना मध्यस्थांशिवाय बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.
कृषी विद्यापीठे व कृषी विज्ञान केंद्रांच्या सहभागातून शास्त्रीय माहितीचे थेट हस्तांतरण करण्यात येत असून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मानही या महोत्सवात करण्यात येणार आहे. तसेच कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ५० कृषी यंत्रांचे प्रातिनिधीक स्वरूपात वितरण करण्यात येणार आहे.
हवामान बदल व वाढता उत्पादन खर्च या आव्हानांना सामोरे जाण्यास शेतकऱ्यांना सक्षम करणे हे या महोत्सवाचे मुख्य उद्दिष्ट असून, या उपक्रमामुळे जिल्ह्यातील शेती अधिक उत्पन्नक्षम व स्पर्धात्मक बनेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. काही विशेष नवलाई या प्रदर्शनात युवकांना पाहण्यास मिळाली. त्यामुळे युवकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद होता.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india