Best News Portal Development Company In India

उमरगा शहरात Water ATM उभारण्याची मागणी ; अँड.शीतल चव्हाण फाउंडेशनचे नगर परिषदेस निवेदन ! उमरगा /लोहारा आदिनाथ भालेराव.

*उमरगा शहरात Water ATM उभारण्याची मागणी; अँड.शीतल चव्हाण फाउंडेशनचे नगर परिषदेस निवेदन*

उमरगा /लोहारा आदिनाथ भालेराव.

उमरगा शहरात व बसस्थानक परिसरात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची तीव्र कमतरता भासत असल्याच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता शहरातील विविध ठिकाणी Water ATM उभारण्याची मागणी ऍड. शीतल चव्हाण फाउंडेशन, उमरगा यांच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबतचे सविस्तर निवेदन आज नगर परिषद उमरगा येथे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, उमरगा हे तालुक्याचे प्रशासकीय व राजकीय केंद्र असल्याने ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा होत असते. विशेषतः बसस्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय अपुरी असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेत ही समस्या अधिक गंभीर बनत असून, नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

यासंदर्भात उमरगा बसस्थानक परिसरात तातडीने स्वच्छ पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी; शहरातील प्रमुख ठिकाणी (बाजारपेठ, शासकीय कार्यालये, रुग्णालय परिसर इ.) Water ATM उभारण्यात यावेत; Water ATM द्वारे नागरिकांना स्वच्छ, शुद्ध व परवडणाऱ्या दरात पाणी उपलब्ध करून द्यावे; नागरिकांना स्वतःच्या बाटल्यांमध्ये पाणी भरता येईल तसेच ठिकाणीच पिण्याची सुविधा उपलब्ध करावी; उभारण्यात आलेल्या Water ATM ची नियमित देखभाल व स्वच्छता सुनिश्चित करून पाण्याची गुणवत्ता कायम राखावी अशा प्रमुख मागण्या फाउंडेशनमार्फत करण्यात आल्या आहेत.

निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, स्वच्छ पिण्याचे पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज असून, ही सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक आहे. नगर परिषद प्रशासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.

या निवेदनावर अँड. शीतल चव्हाण फाउंडेशनमार्फत राजू बटगिरे, राम गायकवाड, धिरज बेळंबकर, करीम शेख, धानय्या स्वामी, प्रदीप चौधरी, बबीता मदने, शबाना शेख, सत्यनारायण जाधव, राजू भालेराव, अँड ख्वाजा शेख, प्रदीप मोरे, अँड. अर्चना जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

दरम्यान, शहरातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ही मागणी अत्यंत महत्त्वाची ठरत असून, नगर परिषद प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india