नराधमाचे निर्घृण कृत्य; दुभत्या गाईंच्या खाद्यात विष कालवले; ३ गाईंचा मृत्यू, ४ मृत्यूशी झुंज देतायत. उपचार सुरू !
तुळजापूर (प्रतिनिधी):
मुक्या प्राण्यांचा जीव घेण्याच्या उद्देशाने खाद्यामध्ये विषारी औषध मिसळून सात गाईंना विषबाधा केल्याची धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील बारुळ शिवारात उघडकीस आली आहे. या विषबाधेमुळे तीन दुभत्या गाईंचा जागीच मृत्यू झाला असून, चार गाईंची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
होनाळा (ता. तुळजापूर) येथील रहिवासी विजय उमराव शेलार (वय ४१) यांची बारुळ शिवारातील गट नं. १६/२ मध्ये शेती आहे. शेलार यांनी आपल्या शेतातील शेडमध्ये दुभत्या गाईंचे पालन केले आहे. ३० मार्च रोजी अज्ञात इसमाने शेडमध्ये शिरून खोडसाळपणे आणि प्राण्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने तेथील ‘नेचर डिलाईट’ कंपनीचा मका भरडा आणि ‘सुगरास’ पशुखाद्याच्या पोत्यामध्ये कोणते तरी तीव्र विषारी औषध मिसळले.
शेलार यांनी नेहमीप्रमाणे हे खाद्य आपल्या सात गाईंना दिले. खाद्य खाल्ल्यानंतर काही वेळातच गाईंना विषबाधेची लक्षणे दिसू लागली. दुर्दैवाने, विष इतके तीव्र होते की त्यातील तीन गाईंचा तडफडून मृत्यू झाला. उर्वरित चार गाईंची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. या घटनेमुळे शेलार यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. योग्य तपास व्हावा अशी मागणी आहे.
या क्रूर घटनेबाबत विजय शेलार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२५ (प्राण्यांना इजा पोहचवणे किंवा ठार मारणे) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
”एका शेतकऱ्याच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या गाईंना अशा प्रकारे विष देऊन मारणे हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून दोषींना लवकरच बेड्या ठोकल्या जातील.”मुख्य प्राण्यांना इजा पोहोचवणाऱ्यास कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि मुक्या प्राण्यांना न्याय मिळवा अशी आशा जनमानसातून व्यक्त होत आहे. तुळजापूर पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहे.






